चांगले काम केल्यास जनतेशी नाळ आपोआप जोडली जाते ः बनसोड कवी अनंत फंदी व्याख्यानमाला; प्रशासकीय सेवेसह कर्तव्यावर लीना बनसोड यांनी टाकला प्रकाश

नायक वृत्तसेवा, संगमनेर
आपल्यातील गुण हेरुन सर्वसामान्यांसाठी काम केल्यास जनतेशी आपली नाळ आपोआपच जोडली जाते. त्यातून दिलेली उत्तम सेवा निश्चितच सकारात्मक परिणाम घडवते आणि उत्तम नेतृत्वातून असंख्य उत्तम नेतृत्व निर्माण होते. म्हणूनच तुम्ही करत असलेले काम इतरांपर्यंत परिणामकारकरित्या पोहचवल्यास समाजातील विषमतेची दरी दूर होईल असा विश्वास आदिवासी विकास विभागाच्या अतिररिक्त आयुक्त लीना बनसोड यांनी व्यक्त केला.

संगमनेरातील कवी अनंत फंदी प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित केलेल्या कवी अनंत फंदी व्याख्यानमालेचे चौथे पुष्प ‘प्रशासनातील आव्हाने व आनंद’ या विषयावर गुंफताना त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी रवींद्र जोशी होते. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. ओंकारनाथ बिहाणी, सचिव जसपाल डंग, अॅड. ज्योती मालपाणी, स्मिता गुणे, डॉ. ओमप्रकाश सिकची आदी उपस्थित होते. यावेळी पुढील कालावधीसाठी प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदी निवड झालेले राजेंद्र भंडारी यांना व्यासपीठावर बोलावून त्यांचं स्वागत करण्यात आले.

प्रशासकीय सेवेत येण्यापूर्वी आपली कौटुंबिक पार्श्वभूमी विषद करताना लीना बनसोड म्हणाल्या, नागपूरच्या शहरी भागात गरिबीची चाहुलही नसलेल्या कुटुंबात जन्म झाल्याने प्रशासकीय सेवेत जाण्यासाठी बंधूंनी प्रोत्साहित केले. वडील सरकारी अधिकारी असल्याने शिक्षणही इंग्रजी माध्यमातून झाले. उत्तम कौटुंबिक वातावरणात वाढलेली असल्याने भविष्यात काय करायचे या प्रश्नावर भावाने प्रशासकीय सेवेत जाण्याचा सल्ला दिला. त्यानुसार प्रशासकीय सेवेत आल्यानंतर गावपातळीवर जाऊन काम करण्यास सुरुवात केली. त्यातून समाजातील विषतेची दरी कमी करण्यासाठी आपल्या कामाविषयी श्रध्दा व भक्ती असली पाहिजे या निर्णयावर ठाम राहून काम करत आहे.

प्रशासकीय अधिकार्यांच्या कर्तव्यावर प्रकाश टाकताना त्या म्हणाल्या, प्रशासकीय सेवेतील अधिकार्यांकडे केवळ स्टील फ्रेम म्हणून पाहिले जाते. जनता व शासनातील दुवा म्हणून भूमिका बजावण्यासाठी जनतेच्या समोर न राहता काम करावे लागते. सुरुवातीला ग्रामविकास विभागात काम करण्याची संधी मिळाली. तेव्हा ग्रामीण भागातील समस्या बघून खूप वेदना झाल्या. त्यामुळे गरीबांच्या व्यथा, वेदना कमी करण्यासाठी प्रयत्न करण्याचा निर्धार करुन कामाचे स्वरुप निश्चित केले. जे आपल्याला मिळाले ते इतरांनाही मिळावे त्यासाठी ग्रामीण कुटुंबाचा कणा असलेल्या महिलांचे संघटन केले. महिलांशी बोलायला सुरुवात केल्याने प्रश्न समजू लागले तशी उत्तरेही मिळू लागली. जीवन जगण्याची खरी ताकद गरीब कुटुंबात असते हे यातून समजले.

असमावेशन, जोखीम, आर्थिक दारिद्-य या तीन बाबी घेवून पुढे काम सुरु राहिल्याचे चांगले परिणाम दिसून आले. अनेक महिला स्वतःची मतं ठामपणे मांडू लागल्या. त्यांची कुटुंबे सुधारली, मुलांना उत्तम शिक्षण मिळावे या दृष्टीकोनातून महिला पुढे आल्या. अनेक अदिवासी भागातील महिला सक्षम झाल्या. वर्धा जिल्ह्यात काम करताना खूप शिकता आले म्हणून केलेल्या कामाची पावती जनतेने त्याच विश्वासाने दिली असल्याचे त्यांनी आवर्जुन नमूद केले. अत्यंत समरसतेने प्रशासकीय कामात झोकून देणार्या सक्षम अधिकारी लीना बनसोड यांच्या व्याख्यानाला संगमनेरकरांनी भरभरुन दाद दिली.
