शंभूराजांच्या बलिदानाचा महाराणी ताराराणीने घेतला सूड नव्या मालिकेच्या कलावंतांनी व्यक्त केल्या भावना…

नायक वृत्तसेवा, नगर
छत्रपती संभाजीराजांच्या बलिदानानंतर स्वराज्य विस्कळीत झाले होते. पण तिसरे छत्रपती राजाराम महाराजांच्या मार्गदर्शनाखाली महाराणी ताराराणीने संताजी घोरपडे व धनाजी जाधव या दोन शूर योद्ध्यांच्या मदतीने औरंगजेबाची कबर मराठी मुलुखातच खोदली व शंभूराजांच्या बलिदानाचा सूड घेतला. अशा या महाराणीची यशोगाथा नव्या पिढीपर्यंत नेण्याची संधी मिळणे हे आमचे भाग्यच आहे, अशी भावना स्वरदा थिगळे, संग्राम समेळ, अमित देशमुख व रोहित देशमुख या कलावंतांनी व्यक्त केली.

सोनी मराठी वाहिनीवर स्वराज्य सौदामिनी ताराराणी ही मराठी मालिका मागील 15 नोव्हेंबरपासून रोज सायंकाळी साडेसात वाजता प्रसारित होत आहे. या मालिकेत महाराणी ताराराणीची भूमिका करणारी स्वरदा थिगळे, छत्रपती राजाराम राजेंची भूमिका करणारे संग्राम समेळ तसेच संताजी घोरपडेंची भूमिका करणारे अमित देशमुख व धनाजी जाधवांची भूमिका करणारे रोहित देशमुख यांनी नगर येथे माध्यमांशी संवाद साधला. मुंबईच्या जगदंब क्रिएशन्सने या मालिकेची निर्मिती केली आहे. या मालिकेबद्दल माहिती देताना अमित देशमुख म्हणाले, महाराष्ट्राला झाशीची राणी माहीत आहे, पण महाराणी ताराराणी फारशी माहीत नाही. 1689 मध्ये शंभूराजांच्या बलिदानानंतर संताजी व धनाजींचा पराक्रमही माहीत आहे. पण त्या पराक्रमाला महाराणी ताराराणी व छत्रपती राजारामराजे यांचे पाठबळ होते. त्यामुळे महाराणी ताराराणीने मोगल सत्तेचा शहेनशाह औरंगजेबाला यशस्वी झुंज देत त्याची अखेर स्वराज्याच्या मुलुखातच केल्याचा इतिहास या मालिकेतून मांडला गेला आहे. नव्या पिढीसमोर हा ऐतिहासिक संग्राम यानिमित्ताने नेण्याचा प्रयत्न केला असल्याचे त्यांनी सांगितले. प्रताप गंगवणे यांनी या मालिकेचे लेखन केले असून, कार्तिक केंडे यांनी दिग्दर्शन केल्याचेही त्यांनी सांगितले.

अंगावर शहारा आला..
संताजी घोरपड़े हे स्वराज्याचे सरसेनापती व शूर योद्धे होते. त्यांची भूमिका करण्याची संधी मिळाल्यावर व त्यासाठी त्यांच्या शौर्याचा इतिहास वाचल्यावर अंगावर शहारे आले, असे आवर्जून अमित देशमुख यांनी नमूद केले. यावेळी संग्राम समेळ व रोहित देशमुख यांनीही आपल्या भूमिकांची माहिती दिली.

मराठी व हिंदी मालिकांतून विविध भूमिका साकारलेल्या स्वरदा थिगळे यांची सुमारे चारशेवर युवतींमधून महाराणी ताराराणीच्या भूमिकेसाठी निवड झाली आहे. ही निवड म्हणजे माझे भाग्यच असल्याचे सांगून त्या म्हणाल्या, महाराणी ताराराणीचे वडील हंबीरराव मोहिते यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या शाहिस्तेखानाच्या मोहिमेची माहिती ताराराणीला दिली होती व त्यातून प्रेरणा घेऊन तिने राजाराम महाराज, संताजी व धनाजी यांच्या मदतीने औरंगजेबाला मात दिली, हा स्फूर्तिदायी इतिहास मालिकेतून प्रेक्षकांपर्यंत नेण्याचा अभिमानास्पद आनंद मिळत आहे.
