शिर्डीत येण्यापूर्वीच तृप्ती देसाईंना पोलिसांनी रोखले

नायक वृत्तसेवा, शिर्डी
भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्षा तृप्ती देसाई यांना शिर्डीच्या प्रांताधिकार्‍यांनी तीन दिवस शिर्डीत प्रवेशबंदी घातली असली तरी, तो आदेश धुडकावून शिर्डीत येण्याची तयारी देसाई यांनी केली आहे. तृप्ती देसाई आज सकाळीच शिर्डीसाठी रवाना झाल्या होत्या. दरम्यान, शिर्डी प्रवेशापूर्वीच त्यांना सुपा टोलनाक्याजवळ पोलिसांनी अडवले आहे.

शिर्डीच्या दिशेने तृप्ती देसाई निघाल्यानंतर शिवसेना महिला आघाडीसह ब्राम्हण महासंघाच्या महिला कार्यकर्त्या, शिवसेनेचे पदाधिकारी आणि शिवसैनिक हे शिर्डीत ठाण मांडून आहेत. देसाई यांनी फलक हटविण्याचा इशारा दिल्याने देसाई यांच्या विरोधात स्थानिक महिला आक्रमक झाल्या आहेत. त्यांनी शिर्डीत यावं, बोर्डाला हात लावावा, आम्ही तृप्ती देसाई यांच्या तोंडाला काळं फासणार असे थेट आव्हान शिवसेनेच्या स्वाती परदेशी यांनी केलं आहे. तर ब्राम्हण महासंघाच्या महिला कार्यकर्त्यांनी तृप्ती देसाई यांना आता शिर्डीत येण्याची परवानगी द्यावी, आम्ही फलकाचे रक्षण करण्यास समर्थ आहोत, त्यांच्या स्टंटला स्टंटनेच उत्तर देणार, असा इशारा महिला ब्राम्हण महासंघाच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे.

दरम्यान, शिर्डी येथील साईबाबा मंदिर येथे दर्शनासाठी येणार्‍या भाविकांनी भारतीय पोषाखात यावे, अशी विनंतीवजा सूचना साईबाबा संस्थानाने भाविकांना केली आहे. यावरून चांगलाच वाद पेटला आहे. भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी तर हा बोर्ड संस्थानने काढला नाही तर आम्ही येऊन काढू, असा इशाराच दिला होता. मात्र अद्याप हा बोर्ड हटविण्यात आलेला नाही. त्यामुळे आम्ही 10 डिसेंबर रोजी हा बोर्ड काढण्यास येणार असल्याचे देसाई यांनी लेखी पत्रच साई संस्थानला पाठवले होते. त्यानंतर तातडीने साई संस्थान व भूमाता ब्रिगेडच्या वादात प्रशासनाने उडी घेत देसाई यांना शिर्डीत येण्यास बंदी घातली होती. तरीही बंदीचा हा आदेश धुडकावत आज शिर्डीसाठी रवाना झाल्या आहेत.

Visits: 12 Today: 1 Total: 115483

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *