आंबीखालसा फाट्यावर मालवाहू ट्रक उलटला कुटी यंत्राचे साहित्य महामार्गावर पसरले अस्ताव्यस्त
नायक वृत्तसेवा, घारगाव
पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील अपघातांची मालिका सुरूच असून, गुरुवारी (ता.2) रात्री साडेअकराच्या सुमारास आंबीखालसा फाटा (ता. संगमनेर) येथे दुभाजकाजवळ मालवाहू ट्रक उलटला. यावेळी ट्रकमधील कुटी यंत्राचे साहित्य महामार्गावर अस्ताव्यस्त पसरले होते.
याबाबत डोळासणे महामार्ग मदत केंद्राच्या पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, मालवाहू ट्रक (क्र. पीबी.10, ईएच.9179) हा पंजाब येथून कुटी यंत्रांचे साहित्य घेवून कोल्हापूर येथे जात होता. दरम्यान, गुरुवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास हा ट्रक पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील आंबीखालसा फाटा येथे आला असता गतिरोधकावर आदळून दुभाजकाजवळ पलटी झाला. या घटनेची माहिती समजताच डोळासणे महामार्ग व घारगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले.
विशेष म्हणजे मालवाहू ट्रक दुभाजकाजवळ पलटी झाल्याने दोन्ही बाजूंची वाहतूक सुरळीत चालू होती. मात्र, महामार्गावर सतत वाहनांचे अपघात होत असून मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. या अपघातातही सुदैवाने कोणालाही गंभीर इजा झाली नाही. परंतु, ट्रकचे नुकसान झाले आहे. तत्पूर्वी अपघात टाळण्यासाठी याठिकाणी उड्डाणपूल करावा, अशी मागणी आंबीखालसाचे माजी सरपंच सुरेश कान्होरे, सामाजिक कार्यकर्ते चेतन कहाणे, सोसायटीचे चेअरमन गोकुळ कहाणे, रमजान सय्यद, श्याम संकपाळ, रवी काशिद, इकबाल सय्यद, हसम शेख, दिलीप हांडे, श्रीधर कहाणे, सोपान भोर, अत्तर सय्यद आदिंनी केली आहे.