कोपरगावच्या तीन युवकांची संगीत क्षेत्रात गगनभरारी ‘गर्लफे्ंरड होशील का?’ गाण्याने लावले तरुणाईला वेड..

नायक वृत्तसेवा, कोपरगाव
तालुक्यातील जवळके गावातील तीन युवकांनी नुकतीच गगनभरारी घेतली आहे. संगीत क्षेत्रात आपल्या कर्तृत्व सिद्ध करुन त्यांनी कोपरगाव तालुक्याचे नाव सातासमुद्रापार नेले आहे. याबद्दल त्यांच्यावर सर्वच स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे. फिरोज मणियार, अक्षय थोरात आणि सागर दरेकर अशी या तिघा अवलियांची नावे आहे.

आशिष श्रावणी दिग्दर्शित ‘गर्लफे्ंरड होशील का?’ गाण्यात शाळा वेबसिरीज फेम अनुश्री माने, सेजल अमनेकर, अक्षय थोरात, सागर दरेकर यांनी अभिनय केला असून प्रसिद्ध गायक व संगीत दिग्दर्शक फिरोज मणियार आणि सोनाली सोनवणे यांनी बहारदार आवाज दिला आहे. यातील फिरोज हा स्थापत्य अभियांत्रिकीचा अभियंता आहे. त्याच्या या स्वप्नाला त्याचे मित्र अक्षय थोरात (एम. कॉम.) आणि सागर दरेकर (विद्युत अभियांत्रिकीचा अभियंता) यांची खंबीर साथ मिळत आहे. घरची बेताची परिस्थिती आणि त्यातून घेतलेले शिक्षण यात नोकरीच्या मागे न लागता तिन्ही युवकांनी वेगळा मार्ग अवलंबला आहे.

विशेष म्हणजे कुणाचाही आधार न घेता त्यांनी तिसरे गाणे प्रदर्शित केले आहे. या क्षेत्रामध्ये आजकाल खूप तरुणी- तरुणांचा सहभाग वाढत चाललेला दिसतोय. परंतु तुमच्यात जिद्द आणि त्यासाठी धडपड असणं आवश्यक असल्याचेच त्यांनी दाखवून दिले आहे. यापूर्वी त्यांची दोन गाणी सादर झालेली असून त्यातील एक गाणे झी म्युझिक सारख्या मोठ्या वाहिनीने घेतलेले आह.े तर त्यांच्या ‘एफएसए प्रॉडक्शन’ या निर्मिती अंतर्गत चालणार्या यू-ट्युब वाहिनीवरही त्यांचे अनेक चाहते आहेत. आज सर्व सोयी-सुविधा उपलब्ध असतानाही युवक नवीन काही करण्यास हिंमत करत नाहीत. परंतु आपल्या शिक्षणास परिस्थिती कुठेही आडवे येऊ न देता आर्थिक परिस्थितीशी झगडत या युवकांनी निवडलेल्या क्षेत्रात ते नशीब आजमावत आहे.

फिरोज या क्षेत्रात कसा आला असे त्याच्या आईला विचारले असता, साईंच्या दरबारी भजन गात गात निर्माण झालेली आवड पुढे स्वप्न झाली आणि त्यातच करिअर करायचं त्यानं ठरवलं. गीतकार, संगीतकार आणि गायक ह्या तिन्ही आघाड्यांवर आव्हान पेलताना दोन्ही जिवलग मित्र मोलाची साथ देत असल्याचेही त्यांनी आवर्जून नमूद केले. यावरुन परिस्थितीशी सामना करण्याची जिद्द, नवीन शिकण्याची तयारी आणि मेहनती स्वभाव यामुळे हे तारे संगीत क्षेत्राच्या आकाशात नक्कीच चमकतील अशी खात्री आहे. या युवकांच्या प्रयत्नांस साईबाबा संस्थांनचे अध्यक्ष आमदार आशुतोष काळे, युवा नेते सुमीत कोल्हे, साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत, पत्रकार मनीष जाधव आदिंनी शुभेच्छा दिल्या आहेत.

तरुणाईला वेड लावेल असे गाणे आहे. तरुण मनातल्या तरल भावना अगदी अचूक शब्दांत टिपलेले हे गाणं आहे. दिग्दर्शन आणि एफएसए प्रॉडक्शन सोबत काम करताना खूप छान वाटलं.
– आशिष पुजारी (दिग्दर्शक-शाळा वेबसिरीज)
