साईनगरीत कडाक्याच्या थंडीने गारठून दोघांचा मृत्यू! एक मुंबईचा तर दुसरा भिक्षेकरी; पोलिसांचा ओळख पटविण्यासाठी प्रयत्न सुरू..
नायक वृत्तसेवा, शिर्डी
गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेला अवकाळी पाऊस आणि प्रचंड गारठ्यामुळे शिर्डीत दोघांचा मृत्यू झाला. त्यातील एकजण मुंबईहून उपचारांसाठी शिर्डीत आल्याचे तर दुसरा भिक्षेकरी असल्याचे स्पष्ट होत आहे. दरम्यान, पाऊस आणि गारठ्यामुळे दगावलेल्या शेळ्या-मेंढ्यांची संख्या दीड हजारांवर गेल्याचे सांगण्यात येते. सध्या पाऊस थांबला असला तरी हवामान ढगाळ आणि हवेत गारठा कायम आहे.
बुधवारपासून जिल्ह्यातील हवामान बदलले आहे. त्याचा फटका रब्बी पिकांना आणि पशुधनालाही बसला. आता शिर्डीत दोघांचा मृत्यू झाल्याचे पुढे आले आहे. शिर्डीत नगर-मनमाड रस्त्यावर एक आणि कणकुरी रस्त्यावर एक असे दोघांचे मृतदेह आढळून आले. याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी पंचनामा करून ते ताब्यात घेतले. दोघांची ओळख अद्याप पटलेली नाही. मात्र, एका मृतदेहाजवळ काही कागदपत्रे आढळून आली आहेत. त्यावर एकनाथ हाटे (रा. कल्याण, मुंबई) असा उल्लेख आहे. कागदपत्रावरून ही व्यक्ती शिर्डीत उपचारासाठी आली असावी, असा अंदाज आहे. त्याआधारे पोलिसांनी नातेवाईकांशी संपर्क साधून खात्रीशीर ओळख पटविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. दुसर्या मृतदेहाजवळ मात्र काहीही आढळून आलेले नाही. तो भिक्षेकरी असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
शिर्डीत भिक्षेकर्यांची संख्या मोठी आहे. सध्या मंदिर सुरू झाल्याने मधल्या काळात गायब झालेले भिक्षेकरी पुन्हा शिर्डीत आले आहेत. ते उघड्यावरच मुक्काम करतात. दोन दिवसांपासून वाढलेल्या गारठ्याचा त्यांना फटका बसला. त्यांच्या मदतीला आता प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते धावून आले आहेत. पक्षाचे शहराध्यक्ष अमोल बानायत यांच्या पुढाकरातून निराधार भिक्षेकर्यांची तात्पुरत्या सस्वरूपात अनाथालयात निवार्याची सोय करण्यात येत आहे.
दरम्यान, शुक्रवारी (ता.3) पाऊस थांबला आहे. सकाळी दाट धुके पडले होते. मात्र, दोन दिवस पाऊस आणि गारठा यामुळे मोठे नुकसान झाले आहे. रब्बी पिके आणि फळबागांसोबतच पशुधनाचेही नुकसान झाले आहे. गारठ्यामुळे जिल्ह्यातील विविध तालुक्यांत सुमारे दीड हजार शेळ्या-मेंढ्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. प्रशासनाने पंचनामे सुरू केले आहेत. ऊस तोडणी मजुरांचेही हाल होत आहे. गारठ्यामुळे कारखान्यांनी दोन दिवस उस तोडणीचे काम बंद ठेवले आहे.