शेतकर्‍यांवरील अत्याचाराची जबाबदारी भाजपला टाळता येणार नाही : थोरात! शेतकर्‍यांना न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरू ठेवणार असल्याचा काँग्रसेचा निर्धार..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
आगामी विधानसभा निवडणुकीतील पराभवाच्या भीतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन काळे कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली. हा गेल्या एक वर्षापासून ऊन, पाऊस आणि रक्त गोठवणार्‍या थंडीत दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणार्‍या देशभरातील शेतकर्‍यांच्या लढ्याचा मोठा विजय आहे. पण आंदोलनादरम्यान शेतकर्‍यांवर केलेल्या अत्याचाराची जबाबदारी भाजप सरकारला टाळता येणार नाही. त्यांनी प्रायश्चित घेऊन माफी मागावी, असे काँग्रेस विधीमंडळ नेते तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.

यासंदर्भात प्रसार माध्यमांशी बोलताना मंत्री थोरात म्हणाले, तीन काळे कृषी कायदे संसदेत मंजूर करुन घेताना केंद्र सरकारने कोणाशीही चर्चा केली नाही. पाशवी बहुमताच्या जोरावर कायदे मंजूर केले. संसदेत या कायद्यांना विरोध करणार्‍या खासदारांना निलंबित केले. देशभरातून या कायद्याविरोधात आवाज उठवण्यात आला. शेतकर्‍यांच्या या आंदोलनाला काँग्रेस पक्षाने सरुवातीपासून पाठिंबा दिला. सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्या निर्देशानुसार देशभर आंदोलने केली. मोदी सरकारला हे तीन काळे कायदे मागे घ्यावेच लागतील आणि सरकार हे कायदे मागे घेईल अशी परखड भूमिका राहुल गांधी यांनी घेतली. आज राहुल गांधी यांचे शब्द पुन्हा खरे ठरले, मोदींना बळीराजाच्या मागण्यांपुढे झुकावे लागले. आजचा निर्णय आधीच घेतला असता तर बळीराजाचे नाहक बळी गेले नसते.

केंद्र सरकारने या शेतकरी आंदोलनाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. शेतकर्‍यांना खलिस्तानी, नक्षलवादी, देशद्रोही म्हणून बदनाम करण्याचा प्रयत्न केला. रक्त गोठवणार्‍या थंडीत शेतकर्‍यांवर पाण्याचा मारा केला, रस्त्यावर खिळे ठोकून त्यांना अडविले गेले. शेकडो शेतकर्‍यांचा मृत्यू या आंदोलनादरम्यान झाला. काही शेतकरी बांधवांना गाडीखाली चिरडून मारले गेले, त्याची जबाबदारी मोदी सरकारला टाळता येणार नाही आणि अन्नदात्याची माफी मागावी लागेल. मोदी सरकार हे ‘हम दो हमारे दो’ साठीचे सरकार आहे. तीन कृषी कायद्याच्या आडून शेतकर्‍यांना संपवण्याचे काम होणार होते. शेतकर्‍यांनी निर्धाराने लढा देऊन कितीही मोठ्या अहंकारी शासनाला झुकवू शकतो, हे दाखवून दिले. शेतकरी एकजुटीचा हा विजय आहे. परंतु शेतकर्‍याला न्याय मिळेपर्यंत हा संघर्ष सुरुच राहिल असे थोरात यांनी स्पष्ट केले.

Visits: 135 Today: 2 Total: 1593311

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *