संत गाडगेबाबांच्या पुण्यतिथीनिमित्त एक हजार ग्रामगीतांचे वाटप आंबीदुमालाचे लोकनियुक्त सरपंच जालिंदर गागरेंचा स्त्युत्य उपक्रम

नायक वृत्तसेवा, घारगाव
संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील आंबीदुमाला गावचे लोकनियुक्त सरपंच जालिंदर गागरे व त्यांचे बंधू उद्योजक बबन गागरे यांनी ‘ग्राममंदिर’ वास्तूचे लोकार्पण कार्यक्रमात सत्काराचा खर्च टाळून तब्बल 1 हजार 8 ‘ग्रामगीतां’चे वितरण केले. त्यांच्या या अनोख्या उपक्रमाचे उपस्थितांसह परिसरातून कौतुक होत आहे.

राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून आंबीदुमाला येथे ग्राममंदिर लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक, अध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. शिष्टाचारानुसार शाल, श्रीफळ असा सत्कार न करता गागरे बंधूंनी ग्रामगीता वाटपाचा निर्णय घेतला. त्यानुसार कार्यक्रमाच्या सांगतेनंतर सर्वांना ग्रामगीता ग्रंथाचे वाटप करण्यात आले.

लोकनियुक्त सरपंच जालिंदर गागरे यांनी पदभार स्वीकारल्यापासून ग्रामगीतेतील वचनांनुसार गावाचा विकास करण्याचा ध्यास घेतला आहे. त्यानुसार स्वखर्चातून ग्राममंदिराची उभारणी, शिवार रस्ते, स्वच्छता आदिंवर विशेष लक्ष केंद्रीत करुन ही कामे तडीस नेली आहे. यामुळे परिसरच नव्हे तर राज्यभर या ग्रामपंचायतची नवी ओळख निर्माण झाली आहे. अनेक पदाधिकारी भेट देऊन संपूर्ण माहिती घेतात. त्यावेळी सरपंच गागरे आवर्जुन ग्रामगीता भेट देतात. आत्तापर्यंत त्यांनी 1 हजार 126 ग्रामगीता ग्रंथांचे वाटप केले आहे. त्यानंतर संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीला 1 हजार 8 ग्रामगीतांचे वाटप केले आहे. या अनोख्या उपक्रमाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

कुटुंबाला धार्मिक परंपरेचा वारसा आहे. वडीलांनी आळंदीमध्ये असंख्य धार्मिक ग्रथांचे मोफत वाटप केलेले आहे. याच संस्कारानुसार ग्रामगीतेत वर्णन केलेल्या समृद्ध गावाच्या संकल्पनेनुसार ग्रामगीता मोफत वाटपाचा निर्णय घेतला. शिवाय संत गाडगेबाबांच्या पुण्यतिथीलाच हे पुण्य काम करण्याचा योग आला.
– जालिंदर गागरे (लोकनियुक्त सरपंच-आंबीदुमाला)
