नगरपालिका निवडणुकांचा बिगुल वाजला! महिना अखेरपर्यंत कच्ची प्रभागरचना करण्याचे निवडणूक आयोगाचे आदेश..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
यापूर्वी मुदत संपलेल्या व डिसेंबर ते पुढील वर्षी फेब्रुवारी दरम्यान मुदत संपणार्‍या नगरपालिका निवडणुकांचा बिगुल वाजला असून राज्यातील अ, ब व क वर्ग नगरपालिकांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग रचनेनुसार वाढीव सदस्यांसह कच्ची प्रभाग रचना करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याबाबत राज्य शासनाने गेल्या 1 ऑक्टोबर रोजीच आदेश दिले होते. मात्र चालू महिन्यात शासनाने वरील तीनही वर्गातील नगरपालिकांच्या सदस्य संख्येत वाढ करण्याचा निर्णय घेतल्याने खोळंबलेल्या कच्च्या प्रभाग रचनेच्या कामाला आता वेग येणार असून निवडणूक आयोगाने कोणत्याही परिस्थितीत या महिन्याच्या अखेरपर्यंत त्याबाबत पूर्णत्त्वाचे आदेश बजावले आहेत. त्यामुळे या वर्ष अखेरपर्यंत प्रभाग रचेनेला अंतिम स्वरुप प्राप्त होवून जानेवारीत आचारसंहिता लागण्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत.

 

गेल्या 1 ऑक्टोबर रोजीच्या आदेशान्वये राज्य सरकारने पूर्वीच्या त्रिसदस्यीय प्रभाग रचनेऐवजी द्विसदस्यीय प्रभाग रचना स्वीकारण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे यापूर्वी मुदत संपलेल्या नगरपालिकांसह चालू वर्षातील डिसेंबर अखेरपर्यंत मुदत संपणार्‍या राज्यातील अ, ब व क वर्ग नगरपालिकांमध्ये नव्याने प्रभाग रचनेचे आराखडे तयार करण्याच्या हालचाली सुरु झाल्या होत्या. मात्र त्यानंतर अवघ्या महिन्याभरातच गेल्या दहा वर्षात वाढलेल्या लोकसंख्येचा विचार करुन राज्य सरकारने या तिनही वर्गातील नगरपालिकांमध्ये लोकसंख्येनुसार सदस्य वाढीचा निर्णय घेतला व त्याबाबत 2 नोव्हेंबर रोजी अध्यादेशही काढण्यात आला. त्यामुळे सुरुवातीला एक सदस्यीय, नंतर द्विसदस्यीय प्रभाग रचना स्वीकारल्यानंतर आता वाढीव सदस्यांना गृहीत धरुन प्रभाग रचना करावी लागणार आहे.

राज्य सरकारच्या निर्णयानुसार अ व ब वर्ग नगरपालिकांमधील पूर्वीची सदस्य संख्या बदलून त्यात दोनने तर क वर्ग नगरपालिकांची सदस्य संख्या तिनने वाढवण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी गेल्या दहा वर्षातील वाढीव लोकसंख्येचा विचार करण्यात आला होता. त्यासोबतच नगरपालिकांच्या किमान सदस्य संख्येच्या निकषांमध्येही यावर्षी बदल करण्यात आला असून अ वर्ग नगरपालिकांच्या क्षेत्रात 40 हजार लोकसंख्येपुढील प्रत्येकी 8 हजार लोकसंख्येला एक, ब वर्गासाठी प्रत्येकी 5 हजार लोकसंख्येला एक तर क वर्ग नगरपालिकांसाठी प्रत्येकी 3 हजार लोकसंख्येला एका सदस्याची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या निकषांनुसार ब वर्गात मोडणार्‍या संगमनेर नगरपालिका क्षेत्राची एकूण लोकसंख्या 65 हजार गृहीत धरुन सदस्य संख्या निश्चित करण्यात आल्याने पालिकेची सदस्य संख्या दोनने वाढून ती आता 30 झाली आहे. त्यामुळे यापूर्वी करण्यात आलेला कच्चा प्रभाग आराखडा आता कालबाह्य झाला असून शहरात नव्याने 15 प्रभागांची रचना करावी लागणार आहे.

या सर्व प्रक्रियांना वेळोवेळी बदललेल्या शासन निर्णयानुसार विलंब होत गेल्याने येत्या डिसेंबरमध्ये मुदत संपणार्‍या संगमनेर नगरपालिकेचे निवडणुकही आता लांबली असून ती थेट फेब्रुवारीत अन्य नगरपालिकांच्या सोबतच होणार आहे. त्यादृष्टीने आवश्यक असलेल्या गोष्टींची पूर्तता करण्यासह नव्या निर्णयानुसार संगमनेरात 30 सदस्यांसाठी एकूण 15 प्रभागांची रचना करण्यात येणार असून कोणत्याही परिस्थितीत 30 नोव्हेंबर पूर्वी त्याबाबतचा कच्चा आराखडा तयार करुन ठेवण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाचे उपायुक्त अविनाश सणस यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकार्‍यांना बजावले आहेत.

त्यामुळे आता प्रभाग रचनेच्या कामांची गती वाढणार असून पुढील महिन्याच्या अखेरपर्यंत प्रभागरचनेला अंतिम स्वरुप प्राप्त होण्याची शक्यता असून पुढील वर्षी जानेवारीच्या सुरुवातीलाच नगरपालिका निवडणूकांची आचारसंहिता लागू होण्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. राज्य सरकारने द्विसदस्यीय प्रभाग रचना स्वीकारल्याने संगमनेरातील अनेक युवा पुढार्‍यांनी गुडघ्याला बाशिंगे बांधली आहेत, मात्र जोपर्यंत अंतिम प्रभाग रचनेचा मसुदा तयार होत नाही तोपर्यंत कोणीही आपली मनातील इच्छा व्यक्त करताना दिसत नसल्याचे चित्रही सध्या संगमनेरात बघायला मिळत आहे.

चालू महिन्यात राज्य सरकारने अध्यादेशाद्वारे राज्यातील महापालिकांसह अ, ब व क वर्ग नगरपालिकांमधील सदस्य संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे संगमनेर नगरपालिकेचे सदस्य संख्याही आता 28 वरुन 30 होणार आहे. यापूर्वी झालेल्या पालिकेच्या निवडणुकीत शहरात 14 प्रभाग होते, मात्र नव्या निकषांनुसार आता त्यात एका प्रभागाची भर पडून संगमनेरातील प्रभागसंख्याही 15 होणार आहे. या निवडणुकीबाबत तरुणांमध्ये मोठा उत्साह असला तरीही अद्याप प्रभागरचनेचा मसुदा निश्चित नसल्याने अनेकांनी ‘थांबा आणि पाहा’चे सूत्र स्वीकारले आहे. प्रभागरचेनेचा मसुदा अंतिम झाल्यानंतर शहरात इच्छुकांची भाऊगर्दी होणार असल्याचे चित्रही यावेळी दिसत आहे.

Visits: 161 Today: 3 Total: 1105600

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *