केंद्राने पिकांना आधारभावाचे संरक्षण देणारा कायदा करावा ः डॉ.नवले वादग्रस्त तीन कृषी कायदे मागे घेतल्यावर शेतकरी संघटनेची प्रतिक्रिया

नायक वृत्तसेवा, अकोले
केंद्र सरकारने केलेले तीन कृषी कायदे मागे घेणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. त्याचे देशभर पडसाद उमटत आहेत. भारतीय किसान सभा या शेतकरी संघटनेनेही यावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. हे कायदे रद्द करण्यासाठी वर्षभरापासून नेटाने लढलेल्या शेतकर्यांना सलाम. आता केंद्र सरकारने पिकांना आधारभावाचे संरक्षण देणारा कायदा करावा, अशी मागणी किसान सभेचे सरचिटणीस डॉ. अजित नवले यांनी केली आहे.

पंतप्रधानांनी ही घोषणा केल्यानंतर यासंबंधी प्रतिक्रिया देताना डॉ. नवले म्हणाले, संबंध वर्षभर देशातील पाचशेपेक्षा जास्त शेतकरी संघटनांनी जो संघर्ष केला, त्या संघर्षाचा हा विजय आहे. या संघर्षामध्ये सहाशेपेक्षा जास्त शेतकर्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्या शहिदांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे स्मरण या निमित्ताने होत आहे. यासोबतच जे लाखो शेतकरी दिल्लीच्या सिमांवर नेटाने लढले त्यांनाही आमचा सलाम, असं नवले यांनी म्हटलं आहे.

सरकारने हे तीन कायदे मागे घेणे हा शेतकरी आंदोलनाचा काही प्रमाणात विजय आहे. यासोबत आधारभावाचे संरक्षण शेतकर्यांना मिळावे यासाठी केंद्रीय कायदा करावा, अशीही आंदोलनाची प्रमुख मागणी आहे. केंद्र सरकारने या मागणीसंबंधी तातडीने सकारात्मक घोषणा करावी, अशी मागणी आम्ही शेतकरी चळवळीच्यावतीने करीत आहोत, असेही नवले म्हणाले.
