संगमनेर बसस्थानक परिसरात प्लास्टिक विरोधी स्वच्छता अभियान नगरपालिका व संगमनेर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय छात्र सेनेचा उपक्रम

नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेर नगरपरिषद व संगमनेर महाविद्यालय राष्ट्रीय छात्र सेना (मुली) यांच्यावतीने शहरातील बसस्थानक परिसरात प्लास्टिक विरोधी स्वच्छता अभियान नुकतेच राबिण्यात आले.

‘माझी वसुंधरा’ अभियान अंतर्गत संगमनेर नगरपरिषद व संगमनेर महाविद्यालयाचे राष्ट्रीय छात्र सेना मुलींचे पथक यांच्या संयुक्त विद्यमाने देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्ताने स्वच्छ भारत मोहीम राबविण्यात आली. नागरिकांमध्ये स्वच्छतेचे महत्व व प्लास्टिक वापरामुळे होणारे दुष्परिणाम याविषयी बसस्थानक येथे जनजागृती करुन प्लास्टिकचा कचरा गोळा करण्यात आला. यावेळी नगराध्यक्षा दुर्गा तांबे, मुख्याधिकारी राहुल वाघ, प्राचार्य डॉ. अरुण गायकवाड, राष्ट्रीय छात्र सेना पथकाच्या प्रमुख लेफ्टनंट हेमलता तारे, नगरपरिषदेचे नोडल ऑफिसर प्रमोद लांडे आदी उपस्थित होते.

संगमनेर नगरपरिषदेच्यावतीने प्लास्टिक वापरावर यापूर्वीच बंदी घातलेली आहे. प्लास्टिक वापर करणारे व्यावसायिक, नागरिकांवर प्लास्टिक जप्ती व मोठी दंडात्मक करण्याची कारवाई करण्यात आलेली आहे. प्लास्टिक विघटन होत नाही व पर्यावरणाला अतिशय घातक आहे. त्यामुळे नागरिकांनी प्लास्टिकचा वापर न करता कापडी पिशव्यांचा वापर करावा, असे आवाहन नगराध्यक्षा दुर्गा तांबे यांनी केले. या अभियानाबद्दल मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी संगमनेर महाविद्यालय छात्र सेनेच्या मुलींचे कौतुक केले. या उपक्रमामध्ये 27 मुलींनी सहभाग घेतला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *