एकविराच्यावतीने विविध क्षेत्रातील महिलांशी संवाद नवरात्रोत्सवात महिलांच्या कर्तृत्वावर टाकला प्रकाश


नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेरातील एकविरा फाउंडेशनच्यावतीने समाजातील विविध घटकांमध्ये उल्लेखनीय कार्य करणार्‍या महिलांच्या यशोगाथा मुलाखती सुरू आहेत. नवरात्रोत्सवात नवदुर्गांचा सन्मान होत असताना समाजातील यशस्वी महिलांच्या कर्तृत्व भरारीचा इतर महिलांना अनुकरणीय असा हा कार्यक्रम लौकिकास्पद करत आहे.

डॉ. जयश्री थोरात यांनी तळागाळातील महिला व मुलींच्या उन्नतीसाठी व त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी एकविरा फाउंडेशनची स्थापना केली आहे. या फाउंडेशनच्यावतीने तालुक्यात अनेक संकल्पना राबविल्या जात आहे. याचाच एक भाग म्हणून हा उपक्रम राबविण्यात आला आहे. समाजातील महिलांना व मुलींना विविध क्षेत्रात पुढे जाण्यासाठी कला, क्रीडा, साहित्य, शिक्षण, अध्यात्म व राजकारण या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणार्‍या महिलांशी संवाद साधून त्यांनी केलेले कार्य व त्यांचे अनुभव त्या कर्तृत्ववान महिलांशी संवाद साधून समाजापर्यंत उचलण्याचे काम एकविरा फाउंडेशनच्या माध्यमातून केले जात आहे.

या संकल्पनेमध्ये निलांबरी कोर्टीकर या प्रसिद्ध गायिकेशी संवाद झाला. त्यांनी स्वतःचे अनुभव व प्रसिद्ध गायक होण्यासाठी काय करावे याची माहिती दिली. तसेच प्रसिद्ध कीर्तनकार सुनीता कातोरे यांची मुलाखत घेण्यात आली. त्यांनी कीर्तनकार होण्यासाठी काय करावे याविषयी आपल्या मुलाखतीत सांगितले. पर्यावरणासाठी काम करणार्‍या व सायकलवर महाराष्ट्र भ्रमंती करणार्‍या प्रणाली चिपटे यांनी आपल्या महाराष्ट्रातील प्रवासाविषयी अनुभव महिलांशी शेअर केले. योगाविषयी समाजातील महिला व मुलींना माहिती व्हावी यासाठी लहान वयात योगामध्ये पारंगत असलेल्या अशा रुणझुण फटांगरे या मुलीने योगा व योगामुळे आपल्या आरोग्यास काय फायदा होतो हे सांगितले. या स्तुत्य उपक्रमाचा महिलांनी व मुलींनी लाभ घ्यावा असे आवाहन एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्ष डॉक्टर जयश्री थोरात यांच्यावतीने करण्यात आले आहे.

Visits: 160 Today: 1 Total: 1922352

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *