कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्यात वन्यजीव सप्ताह साजरा वन्यजीवांचे संरक्षण करण्यासाठी ‘नाशिक ते सांदण दरी’ सायकल रॅली

नायक वृत्तसेवा, राजूर
अकोले तालुक्यातील कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्यात भंडारदरा वनपरिक्षेत्राच्या सौजन्याने 1 ते 7 ऑक्टोबर दरम्यान वन्यजीव सप्ताह साजरा केला गेला असून, या सप्ताहाच्या समारोपाचे औचित्य साधत नुकतीच नाशिक ते आशिया खंडातील सर्वात खोल दरी असलेल्या सांदण दरीपर्यंत सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यातून वन्यजीवांचे संरक्षण करण्याचा संदेश सामान्य माणसापर्यंत पोहोचविण्यात आला.

दरवर्षी 1 ते 7 ऑक्टोबर या दरम्यानचा कालावधी जागतिक वन्यजीव सप्ताह म्हणून पाळला जातो. कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्यात वनपरिक्षेत्र भंडारदरा यांच्यावतीने हा सप्ताह साजरा केला गेला असून 3 ऑक्टोबर रोजी नाशिक ते साम्रद (सांदण दरी) अशी 108 किलोमीटरची सायकल रॅली आयोजित करण्यात आली होती. या सायकल रॅलीमध्ये नाशिक येथील नामवंत 30 सायकलपटू तर वन्यजीव विभागाच्या 10 कर्मचार्‍यांनी सहभाग घेतला होता. प्रत्येक सायकलवर वन्यजीव सप्ताहाचा लोगो व वन्यजीव वाचविण्यासंदर्भातील नामफलक लावलेले होते. या रॅलीचे भंडारदरा (शेंडी) येथील वनविभागाच्या टोलनाक्यावर नाशिक वन्यजीव विभागाचे सहाय्यक वनसंरक्षक अधिकारी गणेश रणदिवे, वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल आडे, दत्ता पडवळे यांच्यासह कर्मचार्‍यांनी जोरदार स्वागत केले.

या वन्यजीव सप्ताहाच्यानिमित्ताने नाशिक येथील वन्यजीव मित्र महाले यांनी कळसूबाई अभयारण्यात प्रामुख्याने आढळणार्‍या बिबट्या या हिंस्र प्राण्यापासून कसे संरक्षण करावे याविषयी बहुमूल्य मार्गदर्शन केले. तर संगमनेर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनाच्या विद्यार्थ्यांनी वन्यजीव सप्ताहाचे औचित्य साधत शेंडीच्या पंचशील चौकात वन्यजीवांचे रक्षण कसे करावे, वन्यजीवांपासून स्वतःचा कसा बचाव करावा या विषयावर पथनाट्य सादर करण्यात आले. या पथनाट्याच्या समारोप प्रसंगी शेंडीचे सरपंच दिलीप भांगरे यांनी वन्यजीव ही राष्ट्रीय संपत्ती असून तिचे आपण रक्षण करणे हे आपले आद्य कर्तव्य असल्याचे सांगितले. याप्रसंगी वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल आढे, वनपाल रवींद्र सोनार, सचिन धिंदळे, भास्कर मुठे, संजय गिते, गुलाब दिवे, महेंद्र पाटील, चंद्रकात तळपाडे, मनीषा सरोदे यांच्यासह वनविभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

Visits: 157 Today: 1 Total: 1103389

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *