सोनविहीर खून प्रकरणातील आरोपीस जन्मठेपेची शिक्षा पोलिसांतील दाखल गुन्हा मागे घेण्यासाठी केला होता खून

नायक वृत्तसेवा, शेवगाव
पोलीस ठाण्यात दाखल केलेला गुन्हा मागे घेण्यास नकार देणार्‍या फिर्यादीच्या नातेवाईकाचा खून करण्याची घटना सोनविहीर (ता. शेवगाव) येथे घडली होती. या गुन्ह्यात आरोपी विकास फुलसिंग भोसले (रा. मोरेचिंचोरे, ता. नेवासा) यास जन्मठेपेची व 15 हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा सत्र न्यायाधीश बी. एम. पाटील यांनी ठोठावली.

पोलीस ठाण्यात दाखल केलेला एक गुन्हा मागे घ्यावा, असे या गुन्ह्यातील आरोपी विकास भोसले व रवी फुलसिंग भोसले (दोघे रा. मोरचिंचोरे, ता. नेवासा) हे फिर्यादीचा नातेवाईक वृद्धेश्वर पुंजाराम काळे (रा. सोनविहीर, ता. शेवगाव) याच्याकडे करत होते. वृद्धेश्वरने गुन्हा मागे घेण्यास नकार दिला. विकास भोसले, रवी भोसले व वृद्धेश्वरचा भाऊ सुरेश पुंजाराम काळे, मनीषा सुरेश काळे हे 7 फेब्रुवारी, 2020 रोजी सायंकाळी सात वाजता वृद्धेश्वरच्या घरी गेले. त्यांनी पुन्हा गुन्हा मागे घेण्याची मागणी केली. त्यास वृद्धेश्वरने नकार दिल्याचा राग आल्याने रवी भोसले याने त्याच्या छातीत चाकू खुपसला. या हल्ल्यामुळे तो जीव वाचविण्यासाठी घराबाहेर पळाला. त्यावेळी रवी व विकास भोसले यांनी पाठलाग करून त्याच्या पायावर दगड टाकून काठीने मारहाण केली.

वृद्धेश्वरला उपचारांसाठी शेवगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मृत वृद्धेश्वरची पत्नी सुनीता यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शेवगाव पोलीस ठाण्यात आरोपी विकास, रवी भोसले, सुरेश काळे व मनीषा काळे यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास पावरा यांनी तपास केला. आरोपी विकास व मनीषा काळे यांना अटक करण्यात आली. या खटल्यात सरकारतर्फे सहा साक्षीदार तपासण्यात आले. मनीषा काळे हिच्याविरुद्ध सबळ पुरावा आढळून न आल्याने तिला मुक्त करण्यात आले. विकास भोसले याच्याविरुद्ध गुन्हा सिद्ध झाल्याने त्यास खुनाबद्दल जन्मठेप व 10 हजार रुपये दंड, बेकायदेशीर घरात घुसल्याबद्दल तीन वर्षे सक्तमजुरी आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. अ‍ॅड. विष्णूदास भोर्डे यांनी सरकारतर्फे काम पाहिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *