काश्मिर खोर्‍यातील तरुण बेकायदा शस्त्रांसह जिल्ह्यात! लष्कर व पोलिसांचे संयुक्त छापे; नऊजणांसह बेकायदा रायफली व काडतुसे जप्त..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
बनावट शस्त्र परवान्याचा वापर करुन बेकायदा बारा बोअरची रायफल बाळगणार्‍या आणि जिल्ह्यातील अहिल्यानगरसह विविध तालुक्यांमध्ये सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत असलेल्या आठजणांसह या संपूर्ण प्रकरणाच्या सूत्रधाराला अहिल्यानगरच्या तोफखाना पोलिसांनी गजाआड केले आहे. भारतीय लष्कराच्या दक्षिण कमांडचा गोपणीय विभाग आणि तोफखाना पोलिसांच्या संयुक्त पथकाने केलेल्या या कारवाईत 12 बोअरच्या नऊ रायफलसह 54 जिवंत काडतुसेही हस्तगत करण्यात आली आहेत. गेल्या चार दशकांपासून दहशतवादाच्या छायेत असलेल्या आणि थेट शत्रूराष्ट्र पाकिस्तानच्या सिमेलगत असलेल्या राजौरीतील नऊजण खोट्या आणि बनावट शस्त्र परवान्याच्या आधारे शेकडों किलोमीटर अंतरावरील अहिल्यानगर जिल्ह्यात नोकरी करीत असताना रायफलींसह आढळल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.


याबाबत तोफखाना पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदरची कारवाई शुक्रवारी (ता.15) जिल्ह्यातील अहिल्यानगरसह श्रीगोंदा, सोनई आणि पुण्यात करण्यात आली. याबाबत भारतीय लष्कराच्या दक्षिण कमांडच्या गोपणीय विभागाला माहिती प्राप्त झाली होती. त्यानुसार त्यांनी पोलीस अधिक्षक राकेश ओला यांच्याशी संपर्क साधल्यानंतर भारतीय लष्कर आणि तोफखाना पोलिसांच्या संयुक्त कारवाईतून हा सगळा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे.


सदरची माहिती प्राप्त होताच मिळालेल्या नावांची खात्री केल्यानंतर संयुक्त पथकाने अहिल्यानगर शहर, श्रीगोंदा व सोनई शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी छापे घालीत आठजणांसह त्यांच्याकडी बारा बोअरची प्रत्येकी एक रायफल, प्रत्येकी सहा जिवंत काडतुसे आणि शस्त्र परवाने ताब्यात घेतले. सदरील शस्त्र परवान्यांची सत्यता पडताळण्यासाठी संयुक्त पथकाने राजौरीच्या जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून सदरचे परवाने वितरित करण्यात आले नसल्याचे व सादर केलेले परवाने बनावट असल्याचे कळविण्यात आले.


त्यानंतर ताब्यात घेण्यात आलेल्या आठ इसमांकडे शस्त्र आणि त्याच्या परवान्यांबाबत अधिक चौकशी केली असता शेर अहेमद गुलाम हुसैन (कलाकोट, जि.राजौरी, जम्मु-काश्मिर) याने त्या सर्वांकडून प्रत्येकी 50 हजार रुपये घेवून त्यांना एक-एक रायफल, प्रत्येकी सहा काडतुसे आणि बनावट शस्त्र परवाना दिल्याचे समोर आले. या माहितीच्या आधारे संयुक्त पथकाने मुख्य सूत्रधाराचा माग काढला असता तो पुण्यात असल्याची माहिती मिळताच तेथे छापा घालीत त्याच्याही मुसक्या आवळून त्याला अहिल्यानगर शहरात आण्णयात आले.


या प्रकरणातून समोर आलेल्या व्यक्ति आपल्याकडील शस्त्र परवाना बनावट असल्याचे माहिती असतानाही त्याचा वापर करीत असल्याचे आढळून आल्याने त्या सर्वांवर भारतीय दंडसंहितेच्या कलम 420, 468, 471, 474, 34 सह भारतीय शस्त्र कायद्याचे कलम 3, 7, 8, 25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून मुख्य सूत्रधार शेर अहेमद गुलाम हुसैन (रा.कलाकोट, जि.राजौरी) याच्यासह शब्बीर मोहंमद इक्बाल हुसैन गुज्जर (वय 38, रा.आर्गी जि.राजौरी), महंमद सलिम उर्फ सालेम गूल महंमद (वय 32, रा.लहा,जि.राजौरी),


महंमद सर्फराज नजीर हुसैन (वय 36) व शहबाज अहमदन नजीर हुसैन (वय 33 रा.दोघेही कोठीयन जि.राजौरी), जहांगिर झाकीर हुसैन (वय 28, रा.डांगरी जि.राजौरी), सुरजित रमेशचंद्र सिंग (रा.सियालसुई जि.राजौरी), अब्दुल रशिद चिडीया (वय 38 रा.कालाकोट जि.राजौरी) व तुफेल अहमद महंमद गाजीया (रा.मोघला जि.राजौरी) अशा नऊजणांना अटक केली आहे. या सर्वांच्या ताब्यातून बनावट शस्त्र परवान्यांसह बारा बोअरच्या एकूण नऊ रायफल आणि 54 जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास तोफखान्याचे निरीक्षक आनंद कोकरे करीत आहेत.


या कारवाईत भारतीय लष्कराच्या दक्षिण कमांड गोपणीय विभागातील अधिकारी व जवानांसह पो.नि.आनंद कोकरे, उपनिरीक्षक शैलेश पाटील, हेड कॉन्स्टेबल दत्तात्रय जपे, सुनील शिरसाठ, अहमद इनामदार, भानुदास खेडकर, योगेश चव्हाण, गणेश धोत्रे, सुधीर खाडे, सुरज वाबळे, पोलीस नाईक वसिम पठाण, कॉन्स्टेबल सुमीत गवळी, शिरीष तरटे, सतिष त्रिभुवन, दत्तात्रय कोतकर, बाळासाहेब भापसे, सतीष भंवर, राहुल म्हस्के व संदीप गिर्‍हे यांचा सहभाग होता. या कारवाईने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून अशाप्रकारे आणखी कितीजण जिल्ह्यात आणि इतरत्र कार्यरत आहेत याबाबत आता शंका-कुशंका व्यक्त व्हायला सुरुवात झाली आहे.

Visits: 60 Today: 2 Total: 112735

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *