सोनईच्या आमराईत आढळला राखाडी धनेश पक्षी! पक्षीप्रेमी राजेंद्र घाटोळे यांनी ओळखला धनेशला
नायक वृत्तसेवा, नेवासा
हिमालय व डोंगरावरील घनदाट जंगलात आढळणारा हार्नबिल म्हणजेच राखाडी धनेश हा दुर्मिळ पक्षी सोनई (ता. नेवासा) येथील मुळा एज्युकेशन सोसायटीच्या आमराईत आढळून आला. योग – प्राणायामसाठी आलेल्या युवकांना या पक्ष्याचे अगदी जवळून दर्शन झाले. हा पक्षी सोनईत आढळल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनी मुळा एज्युकेशन संस्थेच्या परिसरात हजारो प्रकारचे वृक्ष लावून त्यांचे संवर्धन केले आहे. संस्थेचे अध्यक्ष प्रशांत पाटील गडाख यांनी याच संकल्पनेतून परिसरात लाखो वृक्ष लावले. येथील आमराई परिसरात रविवारी (ता.24) पहाटे योग – प्राणायाम व चालण्यासाठी आलेल्या डॉ. संतोष गुरसळ, संजय गर्जे यांना झाडाच्या फांदीवर वेगळ्याच रंगाढंगातील पक्षी दिसला. पक्षीप्रेमी राजेंद्र घाटोळे यांनी या धनेश पक्ष्याला ओळखले.
हार्नबिल म्हणजेच धनेश पक्ष्याच्या जगात 55 प्रजाती असून, त्यांतील 9 प्रजाती भारतात आढळून येतात. हा पक्षी शक्यतो हिमालय, तसेच दक्षिण व पश्चिम भारतातील उंच डोंगरमाथा व घनदाट जंगलांत आढळतो. जोडीने भ्रमण करणारा हा पक्षी फळे, फुले व कीटक खातो. उंच झाडाच्या खोडाला चोचीने टोकरून केलेल्या ढोलीत जोडीने राहतो. दोन हजार फूट उंचावरून तो उडतो. राखाडी रंगाचे केस, मोठे पंख, जाड काळी चोच, असे त्याचे रूप उपस्थितांना चांगलेच भावले.
आकाशात उंच भरारी मारत असलेली पक्ष्यांची जोडी अचानक खाली येऊन आंब्याच्या झाडावर बसली. ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या वृक्षप्रेमामुळे आज एक रुबाबदार पक्षी जवळून पाहण्याचा योग आला.
– राजेंद्र घाटोळे (पक्षीप्रेमी, सोनई)