साईभक्तांसाठी ऑफलाईन दर्शन पास द्या! शिर्डी येथील राष्ट्रवादी पदाधिकार्यांची पालकमंत्र्यांकडे निवेदनातून मागणी
नायक वृत्तसेवा, शिर्डी
देश – विदेशातून येणार्या साईभक्तांसाठी साईबाबा संस्थानने ऑफलाईन दर्शन पास व्यवस्था व प्रसादालय तातडीने सुरू करावे. ऑनलाईन पास मिळविताना भाविकांची लूट होत आहे. प्रसादालय बंद असल्याने गैरसोय होत आहे. त्यामुळे या दोन्ही सुविधा त्वरीत सुरू कराव्यात, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी रमेश गोंदकर व अमित शेळके यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
या निवेदनावर साईबाबा संस्थानचे विश्वस्त महेंद्र शेळके, माजी उपनगराध्यक्ष नीलेश कोते, सुधाकर शिंदे, संदीप सोनावणे, दीपक गोंदकर आदिंच्या स्वाक्षर्या आहेत. अमित शेळके म्हणाले, की साईबाबा संस्थानच्यावतीने भाविकांसाठी ऑफलाईन सशुल्क व निःशुल्क दर्शन पास व्यवस्था तातडीने सुरू करणे गरजेचे आहे. शिर्डीत भाविकांची गर्दी कमी आहे. कोविड संसर्गाची भीती पूर्वीच्या तुलनेत कमी झाली असून, लसीकरण वेगाने सुरू आहे. योग्य ती खबरदारी घेऊन ऑफलाईन पद्धतीने दर्शन पास व्यवस्था सुरू करणे सहज शक्य आहे.
गर्दीच्या वेळी साईबाबा संस्थानच्या वेबसाईटच्या माध्यमातून ऑनलाईन दर्शन पास मिळविणे जिकिरीचे होते. त्यासाठी स्थानिक दलाल व सायबर कॅफेचालक भाविकांना ऑफलाइन दर्शन पास द्या भाविकांकडून जादा पैसे उकळतात. प्रसादालय बंद असल्याने भाविकांची मोठी गैरसोय होते. साईसंस्थानकडे मनुष्यबळ उपलब्ध आहे. त्यामुळे कोविड नियमांचे पालन करून प्रसादालय सुरू करणे शक्य आहे. या बाबी लक्षात घेऊन पालकमंत्र्यांनी साईबाबा संस्थान व्यवस्थापनाला व जिल्हाधिकार्यांना योग्य त्या सूचना द्याव्यात. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुधीर म्हस्के उपस्थित होते.
साईभक्तांसाठी ऑफलाईन दर्शन पास मिळावेत व प्रसादालय सुरू करावे. या दोन्ही मागण्यांबाबत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली. दोन्ही मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकार्यांच्यावतीने त्यांच्याकडे पाठपुरावा केला जात आहे. ऑनलाईन पास मिळविताना भाविकांना अनेकदा मनःस्ताप होतो. कधी जादा पैसे मोजावे लागतात.
– रमेश गोंदकर (जिल्हा उपाध्यक्ष, राष्ट्रवादी कॉँग्रेस)