शिर्डीमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षकास धक्काबुक्की एकावर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल

नायक वृत्तसेवा, शिर्डी
शहरातील कनकुरी रस्त्यारील हॉटेल साईकृष्णा हॉटेलसमोर एका गाडीची चौकशी करत असलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षकास एकाने गोंधळ घालत अरेरावी करत धक्काबुक्की केली. तसेच सरकारी कामात अडथळा आणला. याप्रकरणी पोलिसांनी एकास अटक केली असून शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिर्डी शहरात वाढत्या धूमस्टाईल चोरीच्या घटना रोखण्यासाठी पोलिसांकडून विविध उपाययोजना व विनाक्रमांक वाहनांची तपासणी केली जात आहे. त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर गुरुवारी (ता.28) सकाळी 11 वाजेच्या सुमारास कनकुरी रस्त्यावरील हॉटेल साईकृष्णा समोर एक पांढरा रंग असलेली विनाक्रमांकाची दुचाकी उभी असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्पेश आसाराम दाभाडे व सरकारी वाहन चालक चौकशी करत असताना खंडू मारुती गोर्डे (रा. श्रीरामनगर शिर्डी) याने गोंधळ घालून अरेरावी करत तुम्हाला कोणी अधिकार दिला? मी कोण आहे हे तुम्हाला माहीत नाही. माझी मोठी ओळख आहे. तुम्ही कोण लागून गेले, कागदपत्रे नाही असे सांगत धावून आला, आरडाओरड करुन गोंधळ घालत शासकीय कामात अडथळा निर्माण केला.


याप्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्पेश दाभाडे यांनी फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी खंडू गोर्डे याच्याविरुध्द भादंवि कलम 353, 34 अन्वये गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे. या घटनेची गंभीर दखल शिर्डी विभागाचे उपविभागीय अधिकारी संजय सातव यांनी घेतली असून अधिक तपास पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील करीत आहे.

Visits: 155 Today: 1 Total: 1108110

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *