जनतेवर ‘माझा जीव माझीच जबाबदारी’ असे म्हणण्याची वेळ आली ः विखे निमोण येथे ग्रामपंचायत आणि स्वयंसेवी संस्थेच्यावतीने कोविड केअर सेंटर सुरू

नायक वृत्तसेवा, संगमनेर
कोरोना संबंधी महाविकास आघाडी सरकारच्या घोषणा आणि नियोजन फक्त कागदावर राहिले. माझे कुटुंब माझी जबाबदारी ही घोषणा दिली खरी, मात्र प्रत्यक्षात सरकारच्या निष्काळजी कारभारामुळे जनतेवर ‘माझा जीव माझीच जबाबदारी’ असे म्हणण्याची वेळ आली आहे, अशी टीका भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली.

संगमनेर तालुक्यातील निमोण येथे ग्रामपंचायत आणि स्वयंसेवी संस्थेच्यावतीने उभारण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरचे उद्घाटन राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. आपल्या शिर्डी मतदारसंघात आणि प्रवरानगर परिसरात केलेल्या उपाययोजनांची तुलना करीत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनाही विखे यांनी टोला लगावला. विखे म्हणाले, जनतेला सल्ले देण्यापेक्षा ‘प्रवरे’ प्रमाणे व्यवस्था उभी केली असती तरी कोरोनाच्या संकटात संगमनेर तालुक्यातील जनतेला दिलासा मिळाला असता. या संकटात लोकांना मदत करून आधार देण्याची गरज होती, मात्र, मंत्री फक्त दौरे करून काळजी न करण्याचे सल्ले देतात. यांच्या बैठकांचा केवळ फार्स सुरू आहे. सरकारी यंत्रणेचे सोडा मंत्र्यांनी स्वत:हून नागरिकांसाठी काय केले, असा सवालही विखे यांनी केला.


राज्य सरकारवर टीका करताना विखे-पाटील म्हणाले, सरकारमधील लोकांची इच्छाशक्ती संपली आहे. त्यामुळेच सामाजिक संस्था आणि तरुण कार्यकर्ते जनतेला आधार देण्यासाठी पुढे आले आहेत. या संकटाची तिसरी लाट येण्याची चर्चा आता सुरू झाली आहे. आताच रुग्णांना बेड मिळत नाहीत, औषधे जादा दराने खरेदी करण्याची वेळ आली आहे. काही खासगी रुग्णालयांत रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना घाबरवून सोडले जात आहे. सरकारची कोणतीच व्यवस्था नसल्याने सामान्य माणसाला खासगी रुग्णालयांचा आश्रय घ्यावा लागल्याने मोठे अर्थिक संकट निर्माण झाले आहे.

प्रवरा परिसरात केलेल्या कामाबद्दल ते म्हणाले, प्रवरा ग्रामीण रुग्णालयाने राज्यातील पहिले कोविड रुग्णालय सुरू केले. डॉ.विखे पाटील फाउंडेशन आणि शिर्डी संस्थानच्या रुग्णालयातून सुमारे एक हजार बेडची व्यवस्था झाली आहे. प्रवरा शिक्षण संस्थेच्यावतीनेही पाचशे बेडचे कोविड रुग्णालय सुरू झाले. यामध्ये आणखी वाढ करण्याचा आपला प्रयत्न आहे. प्रवराने जशी व्यवस्था केली तसे काम संगमनेर तालुक्यातही असलेल्या संस्थांच्या माध्यमातून होवू शकले असते. मात्र, ते न झाल्यानेच सामान्य माणसाला उपचारांसाठी वणवण करावी लागत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *