संगमनेरचे ‘रणकंदन’ आणि विखेंची नवी खेळी! ‘दोस्ती’ की ‘दबदबा’?; राजकीय समीकरणांचा गुंता सुटणार?..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक रचनेत डॉ.सुजय विखे-पाटील यांची उत्तर महाराष्ट्राच्या उपाध्यक्षपदी झालेली निवड केवळ पदोन्नती नाही, तर आगामी काळातील ‘सर्जिकल स्ट्राईक’ची पूर्वतयारी मानली जात आहे. दैनिक नायकने शुक्रवारी प्रसिद्ध झालेल्या पहिल्या भागात विखे घराण्याचा भाजपच्या गाभ्यातील प्रवेश आणि उत्तर महाराष्ट्रातील त्यांच्या वाढत्या प्रभावाचा आढावा घेतला. मात्र, या निवडीचा सर्वात मोठा आणि रंजक परिणाम अहिल्यानगर जिल्ह्यात आणि त्यातही संगमनेरच्या राजकीय पटलावर अधिक होणार आहे. एकेकाळी काँग्रेसचा अभेद्य गड राहिलेल्या संगमनेरमध्ये आता सत्तेची नवी समीकरणे आकाराला आली आहेत. भाजपच्या विस्तारवादी धोरणांचा विचार करता भविष्यातील निवडणुका ‘स्वबळावर’ झाल्यास डॉ.विखेंची संगमनेरबाबत काय भूमिका असेल? की, 2014 सालच्या शिर्डी लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीची पुनरावृत्ती होईल असे असंख्य प्रश्‍नही निर्माण झाले आहेत. त्यांची उत्तरे येणार्‍या काळातच मिळणार आहेत.


संगमनेरच्या राजकारणाने गेल्या दोन वर्षांत अनेक कोलांटउड्या पाहिल्या आहेत. कधीकाळी काँग्रेसचे निष्ठावान असलेल्या थोरात-तांबे कुटुंबात पदवीधर निवडणुकीच्या निमित्ताने पडलेली फूट आणि सत्यजीत तांबे यांचे ‘अपक्ष’ आमदार होणे, हा या नाट्याचा पूर्वार्ध होता. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, ज्या विखे-पाटील आणि थोरात कुटुंबात पिढ्यानपिढ्या विस्तव जात नव्हता, त्याच विखे कुटुंबातील डॉ.सुजय विखे यांनी पदवीधर निवडणुकीत सत्यजीत तांबे यांना ‘भूमीपुत्र’ म्हणून जाहीर पाठिंबा दिला. हा बदललेला ‘प्रेमभाव’ केवळ मैत्रीपुरता होता की थोरातांना त्यांच्याच घरात घेरण्याची रणनीती, हे आता स्पष्ट होऊ लागले आहे.


आमदार सत्यजीत तांबे यांनी मामांच्या निष्ठेपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी वाढवलेली जवळीक संगमनेरच्या राजकारणातील एक महत्त्वाची ‘ग्रे शेड’ ठरली आहे. सत्तेत असूनही स्थानिक आमदार अमोल खताळ यांच्यापेक्षा अपक्ष आमदार सत्यजीत तांबे यांना मुख्यमंत्री कार्यालयाकडून मिळणारा प्रतिसाद हा महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्येही ‘संभ्रम’ निर्माण करणारा आहे. त्यातच, नगरपालिकेच्या निवडणुकीत सुरुवातीचा अपवाद वगळता डॉ.सुजय विखे-पाटलांनी घेतलेली ‘अलिप्त’ भूमिका आणि ‘रसद’ पुरवठ्याबाबत दाखवलेली अनास्था तांबे गटासाठी पोषक ठरली. या पार्श्वभूमीवर, आता भाजपचे उपाध्यक्ष म्हणून डॉ.सुजय विखे नेमकी कोणती भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


भाजप हा मुळातच विस्तारवादी पक्ष आहे. अलीकडच्या काळात मित्रपक्षांना सोबत घेऊनही स्वतःची ताकद वाढवण्याचे धोरण भाजपने अवलंबले आहे. उत्तर महाराष्ट्रात लोकसभेला मिळालेला धक्का आणि त्यानंतर विधानसभेत 47 पैकी 43 जागांवर महायुतीने मिळवलेले वर्चस्व पाहता, भाजप आता ‘स्वबळाच्या’ दिशेने पावले टाकत असल्याचे दिसते. अशा स्थितीत डॉ.सुजय विखे यांच्यासमोर मोठे धर्मसंकट उभे ठाकले आहे. एकीकडे त्यांचे विश्वासू सहकारी आणि शिवसेनेचे आमदार अमोल खताळ तर, दुसरीकडे पक्षाचा विस्तार करण्यासाठी संगमनेरमध्ये भाजपचा स्वतंत्र चेहरा उभा करण्याची संघटनात्मक गरज अशा दुहेरी संकटातून त्यांना मार्ग काढावा लागणार आहे.


डॉ.सुजय विखे आता ‘पक्षनिष्ठा’ म्हणून भाजपचा स्वतंत्र उमेदवार देणार की ‘मैत्री’ निभावत अमोल खताळ यांनाच भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवण्यास प्रवृत्त करणार? किंवा तिसरा पर्याय म्हणून सत्यजीत तांबे यांच्याशी पडद्यामागून समझौता करुन थोरातांच्या उरल्यासुरल्या वर्चस्वाला सुरुंग लावणार? हे राजकीय कोडे मात्र कायम आहे. नुकत्याच आमदार तांबे यांनी सभागृहात मांडलेल्या रेल्वे प्रश्नावरुन मुख्यमंत्र्यांकडून समिती स्थापन करण्याचा निर्णय असो किंवा थोरात कारखाना व पालिका निवडणुकीत विखेंनी दाखवलेला ऐनवेळचा नीरस, या सर्व घडामोडी संगमनेरच्या राजकारणात एखादे मोठे ‘स्थित्यंतर’ येण्याची चिन्हे आहेत. त्यात डॉ.सुजय विखे यांचा उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्षपदाचा अधिकार त्यांना आता यासर्व प्रक्रियेत ‘किंगमेकर’च्या भूमिकेत घेऊन गेला आहे.
(समाप्त)


माजी खासदार डॉ.सुजय विखे-पाटील यांची भाजपच्या संघटनात्मक संरचनेत प्रदेश उपाध्यक्षपदी झालेली निवड अहिल्यानगर जिल्ह्याच्या सीमा ओलांडून उत्तर महाराष्ट्राचे नेतृत्व करण्यासाठी असली, तरी त्यांचे खरे कौशल्य संगमनेर आणि राहुरीच्या स्थानिक राजकारणात पक्षाची ‘स्पष्ट’ भूमिका मांडण्यातच पणाला लागणार आहे. पक्षाच्या धोरणांचा अवलंब करीत मिळालेल्या संधीचे सोनं करताना त्यांना थेट पक्ष नेतृत्वाच्या नजरेत भरण्याची सुवर्णसंधीही यातून मिळणार आहे. त्यासाठी त्यांच्याकडून मैत्री आणि पक्षविस्तार यामध्ये कसा सुवर्णमध्य साधला जातो यावरच भविष्यातील संगमनेरसह उत्तर महाराष्ट्राचे राजकारण अवलंबून असेल. 2029 मध्ये होणार्‍या लोकसभा निवडणुकीत शिर्डी मतदारसंघ ‘खुला’ होणार आहे, त्या अनुषंगाने डॉ.विखे-पाटील यांना आपल्या मतदारसंघाची संघटनात्मक बांधणी करण्याचे बळही या निवडीतून मिळाले आहे.

Visits: 3 Today: 3 Total: 1500844

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *