प्रियतमा मुठेंनी पटकावला सौंदर्य स्पर्धेचा मुकुट

नायक वृत्तसेवा, संगमनेर
ठाणे येथे कार्यरत असणार्‍या संगमनेरच्या महिला पोलीस निरीक्षक प्रियतमा मुठे यांनी दिल्लीतील ग्रेटर नोएडा येथे नुकत्याच झालेल्या ‘मिसेस पॅसिफिक इंडिया इंटरनॅशनल’ या सौंदर्य स्पर्धेचा मुकुट पटकावला आहे.

या स्पर्धेत देशभरातील 30 महिलांनी सहभाग घेतला होता. 25 सप्टेंबर रोजी परिसा कम्युनिकेशन या खासगी संस्थेने या स्पर्धेचे आयोजन केले होते. तीन दिवस ही स्पर्धा सुरू होती. शेवटच्या 20 स्पर्धकांमधून त्यांची निवड झाली. सौंदर्य, बुद्धीमत्ता क्रिएटिव्ह, नेतृत्व गुण अशा सर्वच स्तरावर त्यांनी बाजी मारली. ऑक्टोबरमध्ये दुबई व नोव्हेंबरमध्ये दक्षिण कोरियाला होणार्‍या स्पर्धेत मुठे सहभागी होणार आहेत. 2019 मध्ये त्यांनी परफेक्ट मिसेस महाराष्ट्र हा पुरस्कार मिळवला होता. संगमनेर येथील बाळासाहेब मुठे यांच्या कन्या प्रियतमा या ठाणे जिल्ह्यातील कापूरबावडी पोलीस ठाणे येथे पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. मुठे यांच्या यशाने पोलीस दलाची मान उंचावली आहे. त्या 16 वर्षांपासून पोलीस सेवेत आहेत. देशभरातील सौंदर्यवतींमधून त्यांची निवड झाल्याने सर्वत्र अभिनंदन होत आहे. अतिरिक्त पोलीस आयुक्त अनिल कुंभारे, उपायुक्त विनय राठोड, सहाय्यक पोलीस आयुक्त पंकज शिरसाठ, जयंत बजबळे, कापूरबावडी पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक अनिल देशमुख यांच्याकडून प्रोत्साहन मिळाल्याचे मुठे यांनी सांगितले.

Visits: 16 Today: 2 Total: 115573

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *