माळेवाडीत मासेमारीसाठी गेलेल्या पती-पत्नीचा बुडून मृत्यू

नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
तालुक्यातील माळेवाडी येथे बंधार्‍यात मासेमारीसाठी गेलेले आदिवासी कुटुंबातील पती-पत्नी बुडाले. चंद्रकला मंजाबापू गायकवाड (वय 35), मंजाबापू भागवत गायकवाड (वय 40) असे त्यांची नावे असून मंगळवारी (ता5) दुपारच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे.

या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांसह तालुका पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत शोधकार्य सुरु केले. मात्र बंधार्‍यातील वाहत्या पाण्याचा प्रवाह जलद असल्याने दोघेही पाण्यासोबत वाहून गेले. काही वेळानंतर स्थानिक तरुणांच्या मदतीने चंद्रकला यांचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला. मंजाबापू यांच्यासाठी सायंकाळी उशिरापर्यंत शोधकार्य सुरु असल्याची माहिती पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांनी दिली. पोलिसांनी पंचनामा करुन एक मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी येथील रुग्णालयात पाठविला होता. गायकवाड हे पत्नी समवेत बंधार्‍याच्या भिंतीवर मंगळवारी दुपारी मासेमारीसाठी गेले होते. बंधार्‍याच्या भिंतीवर मासे पकडताना तोल जाऊन ते पाण्यात पडले. त्यांना वाचविण्यासाठी गेलेल्या पत्नी चंद्रकलासह दोघेही वाहत्या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी बंधारा परिसरात गर्दी केली. मात्र वाहत्या पाण्याचा प्रवाह जलद असल्याने वाचविण्यात अपयश आले. पोलीस निरीक्षक साळवे यांच्या पथकाने घटनास्थळी पाहणी करुन माहिती घेतली. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, मागील महिन्यात तालुक्यातील कान्हेगाव परिसरात दोन चिमुरड्यांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर पुन्हा मासेमारीसाठी गेलेल्या गायकवाड दाम्पत्याला आपला जीव गमवावा लागला.

Visits: 149 Today: 1 Total: 1982169

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *