दोघांना वाचवले, पण मुलाला वाचविताना पित्याचाही बुडून दुर्दैवी मृत्यू मुर्शतपूर शिवारातील घटना; अथक प्रयत्नांनी बापलेकांचे मृतदेह शोधले

नायक वृत्तसेवा, कोपरगाव
मंडपी बंधार्‍यावरून मुर्शतपूरकडे तिघे मित्र जात असताना बंधार्‍यातील पाण्याचा अंदाज न आल्याने एकजण पडला. त्याला वाचविण्यासाठी दोघे पाण्यात उतरले. मात्र हे तिघे बुडत असल्याचे पाहून त्या तिघांपैकी एका मुलाच्या वडिलांना समजले त्यांनीही वाहत्या पाण्यात उडी घेत इतर दोन मुलांना जीवनदान दिले. मात्र पोटच्या गोळ्याला वाचवत असताना मंगळवारी (ता.5) बापलेकाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.

मुर्शतपूर शिवारातील गांजेवाडी परिसरातील मंडपी बंधार्‍यात मंगळवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली. संजय मारुती मोरे (वय 35), सचिन संजय मोरे (वय 15) अशी मयत झालेल्यांची नावे आहेत. या घटनेची माहिती कळताच तहसीलदार विजय बोरुडे, पोलीस निरीक्षक वासुदेव देसले बचाव पथकासह हजर झाले. कोल्हे कारखान्याचे उपाध्यक्ष आप्पासाहेब दवंगे हे कारखान्याच्या रुग्णवाहिकेसह बचाव कार्य करणार्‍या यंत्रणेसह हजर होऊन गावकर्‍यांच्या मदतीने दोन तासांच्या अथक प्रयत्नाने बापलेकांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. यावेळी सरपंच पती अनिल दवंगे, तंटामुक्ती अध्यक्ष अन्वर शेख, संतोष गोसावी यांच्यासह अनेकांनी मृतदेह बाहेर काढण्यात मदत केली.

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, मुर्शतपूर शिवाराच्या गांजेवाडी परिसरातील मंडपी बंधार्‍यात सचिन संजय मोरे (वय 15), ओम दत्तात्रय मोरे (वय 12) व शुभम योगेश पवार हे तिघे मुले बंधार्‍यात मासे पकडण्यासाठी गेले. पाण्याचा अंदाज न आल्याने एकाचा तोल पाण्यात गेल्याने तो बुडू लागला त्याला वाचवण्यासाठी आरडाओरड करीत इतर दोघे पाण्यात उतरले. पाण्याच्या वेगामुळे मुलांना पोहता येत असूनही गटांगळ्या खात होते.

आपला मुलगा, पुतण्या व त्यांचा मित्र पाण्यात बुडत असल्याचे संजय मोरे यांच्या लक्षात येताच त्यांनी वाहत्या पाण्यात उडी मारुन शुभम पवार व पुतण्या ओम मोरे यांना पाण्यातून यशस्वीपणे बाहेर काढून जीवदान दिले. सचिन मोरेला वाचविण्यासाठी बाप म्हणून काळजीने त्याला पाण्याबाहेर काढताना धरलेला हात निसटला. मुलगा वाहत गेला पुन्हा त्याचा पाण्यात शोध घेताना संजय मोरे व सचिन मोरे या दोघा बापलेकांचा पाण्यात बुडून दुर्दैवाने मृत्यू झाला. मयत संजय मोरे यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. मयत सचिन हा मोठा मुलगा होता. या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Visits: 161 Today: 2 Total: 1873840

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *