संगमनेरातील 24 गावांत अत्यावश्यक सेवा वगळता कडक लॉकडाऊन पठारभागातील मुख्य बाजारपेठ असलेल्या घारगावसह बोटामध्ये कडकडीत ‘बंद’

नायक वृत्तसेवा, घारगाव
राज्यातील अनेक जिल्ह्यांत कोरोनाचा संसर्ग घटत असताना अहमदनगर जिल्ह्यात मात्र चिंता कायम आहे. जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट 5 टक्के आहे. त्यामुळे जिल्ह्यातील 10 पेक्षा जास्त उपचाराधीन रुग्ण असलेल्या 61 गावांत कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. या गावांमध्ये 4 ते 13 ऑक्टोबरपर्यंत कंटेन्मेंट झोन लागू करण्याचा आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिला आहे. त्यामुळे तेथील शाळा आणि मंदिरेही खुली होणार नाहीत. यामध्ये सर्वाधिक संगमनेरातील 24 गावांचा समावेश आहे. यात पठारभागातील मुख्य बाजारपेठ असलेल्या घारगावसह बोटा गावाचा समावेश आहे. यामुळे ऐन सणासुदीत नागरिकांना बंधनांत अडकण्याची वेळ आली आहे.

अहमदनगरच्या कोरोना बाधितांची संख्या पुण्यातील रुग्णालयांत वाढत असल्याची गंभीर दखल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेऊन अहमदनगरमध्ये तातडीने उपाययोजना करण्याचा आदेश नुकताच दिला आहे. यामध्ये सर्वाधिक 24 गावे संगमनेर तालुक्यातील आहेत (गुंजाळवाडी, शेडगाव, निमगाव जाळी, आश्वी बुद्रुक, आश्वी खुर्द, पारेगाव बुद्रुक, पानोडी, शिबलापूर, बोटा, घारगाव, उंबरी, पिंपरणे, वेल्हाळे, खळी, देवगाव, घुलेवाडी, कोल्हेवाडी, वडगाव लांडगा, तळेगाव, चंदनापुरी, कनोली, निमोण, वडगाव पान, सायखिंडी). श्रीगोंदा नऊ, राहाता सात, पारनेर सहा, शेवगाव चार, अकोले व श्रीरामपूर प्रत्येकी तीन, कर्जत दोन तर कोपरगाव व पाथर्डी प्रत्येकी एका गावाचा समावेश आहे. जिल्ह्यातील प्रमुख देवस्थाने असलेल्या शिर्डी, शनिशिंगणापूर, मोहाटा देवी, मढी, राशीन, बुर्‍हाणनगर, केडगाव या गावांचा यात समावेश नाही, ही समाधानाची बाब आहे.

कडक लॉकडाऊन करण्यात आलेल्या गावातील फक्त किराणा दुकाने सकाळी 8 ते 11 या वेळेत सुरू राहतील. गावातील लोकांना बाहेरगावी जाण्यास आणि बाहेरच्या लोकांना या गावात येण्यास बंदी राहील. अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवहार बंद राहणार आहेत. विवाह आणि इतर कार्यक्रमांना बंदी आहे. तर अंत्यविधी आणि दशक्रिया विधी 20 लोकांच्या उपस्थितीत करता येईल. गावातील अंतर्गत आणि पर्यायी रस्ते बंद ठेवण्यात येणार आहेत. मुख्य रस्त्यावरील गावांत फक्त पुढे जाणार्‍या वाहनांनाच परवानगी देण्यात येणार आहे. बाहेरगावच्या लोकांना अशा गावात थांबता येणार नाही. यासोबत कंटेन्मेंट झोनचे सर्व निर्बंध लागू राहणार आहेत.

जिल्ह्यात दैनंदिन रुग्णसंख्या 500 ते 800 च्या दरम्यान असते. अनेकदा आढावा बैठका घेतल्या, उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या मात्र फरक पडला नाही. नाशिकचे विभागीय आयुक्त डॉ. राधाकृष्ण गमे यांनी अलीकडेच अहममदनगरला भेट देऊन 20 पेक्षा जास्त उपचाराधीन रुग्ण असलेल्या गावांत कोरोना समित्यांमार्फत उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या. मात्र, तरीही फरक पडला नाही. अलीकडेच उपमुख्यमंत्री पवार यांच्या उपस्थितीत पुण्यात आढावा बैठक झाली. त्यावेळी ससून हॉस्पिटलमध्ये अहमदनगर जिल्ह्यातील 40 टक्के रुग्ण असल्याची माहिती पुढे आली. त्यावर हे रुग्ण कोणत्या गावांतील आहेत, तेथील परिस्थिती का आटोक्यात येत नाही, याचा शोध घेऊन कडक उपाय करण्याचा आदेश पवार यांनी दिला होता. त्यानुसार आता 20 नव्हे तर 10 पेक्षा जास्त रुग्ण असलेल्या गावांवरही बंधने लादण्यात आली आहेत.

यामुळे पठारभागातील 46 गावांची मुख्य बाजारपेठ तथा केंद्रबिंदू असलेल्या घारगावसह बोटामध्ये लॉकडाऊन लागू झाल्याने नागरिकांसह शेतकर्‍यांना मोठी कसरत करावी लागणार आहे. यापूर्वी देखील साकूर गटातील 20 गावांवर निर्बंध लादलेले होते. त्यानंतरही साकूरसह पठारभागातील रुग्णसंख्या आटोक्यात आलेली नाही. शेवटी जिल्हाधिकार्‍यांनी कडक उपाय करण्याच्या दृष्टीने 13 ऑक्टोबरपर्यंत लॉकडाऊन जाहीर केला आहे.

Visits: 156 Today: 1 Total: 1112712

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *