चोराचा कारनामा; चोरीचे दागिने पतसंस्थेत ठेवले गहाण! मालदाड येथील घटना; पोलिसांच्या सखोल तपासातून भांडाफोड
![]()
नायक वृत्तसेवा, संगमनेर
तालुक्यातील मालदाड येथून बॅगेत ठेवलेले 1 लाख 75 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरून लंपास केले होते. याप्रकरणी पोलिसांनी कसून तपास करत आरोपी रवीकिरण सुखदेव मंडलिक (मूळ रा.समशेरपूर, ता.अकोले) यास अटक करून 1 लाख 75 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत केले. आश्चर्य म्हणजे आरोपीने चोरीचे दागिने एका नामांकित पतसंस्थेत गहाण ठेवून कर्ज काढलेही होते, असे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. या धक्कादायक प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे.

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, संगमनेर तालुक्यातील मालदाड येथील भाऊपाटील देवराम नवले (वय 41) यांच्या घरासमोरून दि. 17 डिसेंबर, 2020 रोजी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास बॅगेतून 75 हजार रुपये किंमतीचे 3 तोळे वजनाचे सोन्याचे गंठण, कानातील झुबे पान तसेच प्रत्येकी 10 ग्रॅम वजनाचे 2 सोन्याचे कॉईन मिळून एकूण 1 लाख 75 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरून लंपास करण्यात आले होते.

दरम्यान, भाऊपाटील नवले यांनी मुंबई येथून भावाला व बहिणीला गावी मालदाड येथे आणण्यासाठी चारचाकी गाडी पाठविली होती. सदर गाडीवर चालक म्हणून रवीकिरण सुखदेव मंडलिक हा पाठविला होता. 17 डिसेंबर, 2020 रोजी रात्री 9 वाजता रविकिरण मंडलिक याने भाऊपाटील नवले यांच्या भावाला व बहिणीला मालदाड येथे घरी आणून सोडले. यावेळी गाडीतील बॅगा रवीकिरण मंडलिक याने घरासमोर आणून ठेवल्या होत्या. बहीण मानसी राहुल वाळुंज ही 31 जानेवारी, 2011 रोजी मुंबई येथे जाण्यासाठी निघाली असता बॅगमधे दागिने नव्हते. त्यामुळे गाडीचा चालक रवीकिरण मंडलिक यानेच दागिन्यांची चोरी केल्याची फिर्याद भाऊपाटील देवराम नवले (रा.मालदाड रोड, संगमनेर) यांनी दिली होती.

त्यानुसार संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा नोंदविण्यात आला होता. या प्रकरणी आरोपी रवीकिरण सुखदेव मंडलिक यास ताब्यात घेत पोलिसांनी अटक केली. पोलीस तपासात आरोपीने 10 ग्रॅम वजनाचे 2 सोन्याचे कॉईन राहाता येथील सोनारास विकले होते, तर संगमनेर येथील एका पतसंस्थेत 3 तोळे वजनाचे सोन्याचे गंठण, कानातील झुबे गहाण ठेवून कर्ज काढल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. पोलिसांनी आरोपीकडून 1 लाख 75 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत.
