कुरकुंडी शिवारात पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा!

नायक वृत्तसेवा, घारगाव
संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील कुरकुंडी शिवारात गेल्या काही महिन्यांपासून बेकायदा चालणार्‍या जुगार अड्ड्यावर छापा टाकण्यासाठी अखेर घारगाव पोलिसांना मुहूर्त सापडला आहे. रविवारी (ता.3) सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास पोलिसांनी छापा टाकत रोख रकमेसह जुगाराचे साहित्य जप्त केले आहे. याप्रकरणी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, उशिरा का होईना पोलिसांना जुगार अड्ड्यावर छापा टाकण्यासाठी वेळ मिळाला असल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे.

याबाबत घारगाव पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, कुरकुंडी शिवारातील एका शेतात पाण्याच्या टाकीजवळ बेकायदा तीन पानी पत्याचा जुगार अश्पाक नवाब पठाण (वय 38), निजाम हसन पटेल (वय 45), रफिक कासम पटेल (वय 43), विक्रम शांताराम घोलप (वय 33, चौघेही रा.कुरकुंडी) तर संजय धोंडीबा तळपे ( वय 40), तानाजी नामदेव मुसळे (वय 55, दोघेही रा.बोटा) आणि गोपा नरसिंह भालके (वय 39, रा.कोठे बुद्रुक) खेळत असल्याची माहिती पोलिसांना समजली. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकून रोख रकमेसह जुगाराचे साहित्य जप्त केले आहे. या प्रकरणी पोलीस नाईक किशोर लाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून घारगाव पोलिसांनी वरील सात जणांविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 228/2021 मुं. जु. का. कलम 12 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान गेल्या अनेक महिन्यांपासून कुरकुंडी शिवारात बेकायदा जुगाराचा अड्डा सुरू होता. मात्र याकडे पोलिसांनी दुर्लक्ष केले होते. आता मात्र मोठी कारवाई दाखवण्यासाठी ही थातूरमातूर कारवाई केल्याची चर्चा नागरिकांत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *