एकमेकांच्या साथीने दिव्यांगांनी सर केला कोरीगड किल्ला! ऐतिहासिक व भौगोलिक माहिती जाणून घेत लुटला दुर्गभोजनाचा आनंद

नायक वृत्तसेवा, अकोले
राज्यभरातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील 12 दिव्यांगांनी एकत्र येत यशस्वी दुर्गभ्रमंती करून पर्यटनाचा आनंद घेतला. त्यासाठी त्यांनी दुर्गम व जंगली असलेल्या कोरीगड किल्ल्याची निवड केली. किल्ला सर केल्यानंतर सर्वांनी कोरीगड किल्ल्याची ऐतिहासिक व भौगोलिक माहिती जाणून घेतली.

लोणावळ्याजवळील कोरीगड गडावर 19 सप्टेंबर रोजी दुर्गभ्रमण व अभ्यास मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. या दुर्ग मोहिमेत राज्यातील विविध जिल्ह्यातील तब्बल बारा दिव्यांगांनी सहभाग घेतला होता. सकाळी आठ वाजता प्रत्यक्ष चढायला सुरुवात करण्यात आली. एकमेकांना प्रोत्साहन देत हाताला हात देऊन आधार देत दिव्यांगांनी कठीण गड वाटेतील अवघड टप्पे सर केले. या मोहिमेचे नेतृत्व दुर्गप्रेमी धर्मेंद्र सातव यांनी केले. तीन तासांत किल्ल्याचा सर्वोच्च माथा सर केल्यानंतर दुर्ग अभ्यासक कचरू सांभारे यांनी कोरीगड किल्ल्याची ऐतिहासिक व भौगोलिक माहिती सर्व दुर्गप्रेमींना दिली. किल्ल्यावरील कोराई देवी मंदिर, गणेश मंदिर, महादेव मंदिर, हनुमान मंदिर, महादरवाजा गुहा, पाण्याची टाकी, बुरुजावरील ध्वजस्तंभ विविध आकाराच्या तोफा व दूरवर पसरलेले विविध फुलांचे वाटवे पाहून सोबत आणलेली भाजी भाकर खात सर्वांनी दुर्ग भोजनाचा आनंद घेतला.

लोणावळा डोंगररांगेत असलेल्या किल्ल्याचे महत्त्व म्हणजे छत्रपती शिवरायांना पुरंदरचा तह करावा लागला त्यावेळी त्यांच्याकडे असलेल्या 35 किल्ल्यांपैकी तेवीस किल्ले औरंगजेबाला द्यावे लागले आणि बारा किल्ले स्वतःकडे ठेवून घेतले त्यात महत्त्वाचा हा कोरीगड किल्ला. चौथ्या शतकात निर्मिती झालेल्या आणि पंधराव्या शतकात पुनर्बांधणी करण्यात आलेल्या या कोरी गडाला सहाशे पायर्यांचा किल्ला म्हणून ओळख आहे. शिव ऊर्जा प्रतिष्ठान ही संस्था राज्यातील दुर्गप्रेमी दिव्यांगांसाठी विविध गड-किल्ल्यांवर दुर्गभ्रमण व संवर्धन करणारी संस्था आहेत. या अनोख्या उपक्रमाबद्दल या 12 दिव्यांगाचे मित्रपरिवाराने अभिनंदन केले आहे

लोणावळ्यापासून वीस किलोमीटर अंतरावर असलेल्या या किल्ल्याच्या भटकंतीचे आयोजन ऊर्जा प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिवाजी गाडे यांनी केले होते. शिवाजी गाडे, धर्मेंद्र सातव, कचरू चांभारे, अंजली प्रधान, जनार्दन पानमंद, केशव भांगरे, जगन्नाथ चौरे, मच्छिंद्र थोरात, जीवन टोपे, कैलास दुरगुडे, रमेश गाडे, वैजनाथ देवडकर, महेश गोडे, सुशिला नाईक असे राज्यातील विविध जिल्ह्यांतून 12 दुर्गप्रेमी दिव्यांग या मोहिमेत सहभागी झाले होते.

Visits: 19 Today: 2 Total: 115479

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *