कोविड नियमांचे उल्लंघन करणार्यांवर कठोर कारवाई करा ः डॉ.गमे

नायक वृत्तसेवा, नगर
कोरोना रुग्णांची संख्या कमी जास्त होत असलेल्या अहमदनगर जिल्ह्यात नियम कडक करण्याच्या सूचना वरीष्ठ अधिकार्यांनी दिल्या आहेत. नाशिकचे विभागीय आयुक्त डॉ.राधाकृष्ण गमे यांनी सोमवारी (ता.20) आढावा बैठक घेतली. त्यामध्ये या सूचना देण्यात आल्या असून नियमांचं उल्लंघन करणार्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

मास्कचा वापर करण्याचा नियम अधिक कडक करण्यात आला आहे. तसेच पोलिसांना रस्त्यावर उतरून कारवाईचा आदेश देण्यात आला. त्यानुसार पोलिसांनी सायंकाळपासूनच कारवाई सुरू केली आहे. बाजारपेठेसोबतच दुचाकीवरून प्रवास करणार्या विना मास्क नागरिकांवर कारवाई करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात ही आढावा बैठक घेण्यात आली. जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, महापालिकेचे आयुक्त शंकर गोरे, जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी संदीप सांगळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुनील पोखरणा उपस्थित होते. जिल्ह्यातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने आरटीपीसीआर चाचण्या वाढवण्याचे निर्देश डॉ.गमे यांनी बैठकीत दिले. संभाव्य तिसरी लाट आली तर तशी तयारी ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. हॉस्पिटलमधील बेड्स, ऑक्सिजन व इतर सुविधांचा आढावा घेण्यात आला.
