नेवासा तालुक्यातील सरपंचांना संविधान पुस्तिकांचे वाटप यशवंत सामाजिक प्रतिष्ठानचा डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त उपक्रम

नायक वृत्तसेवा, नेवासा
तालुक्यातील 114 सरपंचांना संविधान पुस्तिकांचे वाटप करण्याचा उपक्रम यशवंत सामाजिक प्रतिष्ठानतर्फे हाती घेण्यात आला आहे. त्याचा प्रारंभ बुधवारी (ता.14) डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मोरया चिंचोरे येथे करण्यात आला. या उपक्रमाचे तालुक्यात उत्स्फूर्त स्वागत होत आहे.

ज्या महामानवाने देशाला सर्वोच्च राज्यघटना दिली, त्यांच्या जयंतीनिमित्त प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत गडाख यांच्या संकल्पनेतून तालुक्यातील 114 सरपंचांना संविधान पुस्तिका भेट देण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला. आदर्श गाव मोरया चिंचोरे येथे उपविभागीय कृषी अधिकारी संजय काचोळे यांच्या हस्ते डॉ.आंबेडकर तालुक्यातील पाच सरपंचांना प्रातिनिधिक स्वरूपात पुस्तिका देण्यात आल्या. राहिलेल्या 109 सरपंचांना पुस्तिका घरपोच देण्यात येणार आहेत. डॉ.आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. लोहगावच्या सरपंच सुवर्णा पटारे, मोरया चिंचोरेच्या सरपंच जयश्री मंचरे, सोनईचे सरपंच धनंजय वाघ, वांजोळीच्या सरपंच सोनाली खंडागळे, खडक्याचे सरपंच संदीप सोनकांबळे उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते मोरया चिंचोरे येथील जंगलात वृक्षारोपण करण्यात आले.

गावपातळीवर काम करताना थोर पुरुषांचा आदर्श समोर असणे गरजेचे आहे. पंचायत राज व्यवस्थेत सर्वसामान्य जनतेला अभिप्रेत असणारे काम विनासायास पूर्णत्वास जावे यासाठी हा उपक्रम हाती घेतला आहे. भारतीय राज्यघटनेचा अमूल्य ठेवा सर्व सरपंचांना निश्चित उपयोगी पडेल.

– प्रशांत गडाख (अध्यक्ष, यशवंत सामाजिक प्रतिष्ठान)

यशवंत प्रतिष्ठानने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त दिलेली ग्रंथभेट अमूल्य आहे. गावगाडा हाकताना ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांचे कार्य व प्रतिष्ठानचा आदर्श उपयोगी पडतो. गावहिताच्या कामासाठी हा उपक्रम प्रेरणादायी आहे.

– धनंजय वाघ, सरपंच, सोनई.

Visits: 13 Today: 1 Total: 106859

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *