तीन चिमुरड्यांचा शेततळ्यात बुडून दुर्दैवी मृत्यू कान्हेगाव परिसरातील घटना; परिसरात पसरली शोककळा

नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
तालुक्यातील कान्हेगाव परिसरात आदिवासी कुटुंबातील तीन चिमुरड्यांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. येथील प्रवरा नदीपट्यातील कान्हेगाव शिवारात सोमवारी (ता.20) दुपारी 12 वाजेच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. त्यामुळे कान्हेगावसह परिसरात शोककळा पसरली आहे.

चैतन्य अनिल माळी (वय 10 वर्ष), दत्ता आनिल माळी (वय 8 वर्ष) व चैतन्य श्याम बर्डे (वय 8 वर्ष) अशी त्यांची नावे असल्याची माहिती पालीस निरीक्षक मधुकर साळवे यांनी दिली. कान्हेगाव येथील अतुल बाळासाहेब खरात यांच्या शेततळ्यात खेळण्यासाठी गेलेली तिन्ही चिमुरडे पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाले. ही माहिती मिळताच ग्रामस्थांसह पोलिसांनी घटनास्थळी तातडीने धाव घेत पाहणी केली. काही वेळानंतर पोलिसांनी स्थानिक तरुणाच्या मदतीने मृतदेह पाण्याबाहेर काढून येथील कामगार रुग्णालयात उत्तरणीय तपासणीसाठी पाठविले. दुपारी उशिरापर्यंत मृतदेह उत्तरणीय तपासणी करुन पंचनामा करण्याची कारवाई सुरु होती.

चैतन्य माळी व दत्ता माळी हे दोघे सख्ये भाऊ असून ते चैतन्य बर्डे याच्यासह सोमवारी (ता.20) सकाळी शेततळ्याच्या परिसरात खेळण्यासाठी गेले होते. यापैकी तिघे चिमुरडे कपडे काढून पाणी खेळण्यासाठी शेततळ्यात उतरले. मात्र पोहता येत नसल्याने तसेच शेततळ्यातील पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामुळे मयतांच्या माळी आणि बर्डे कुटुंबियांसह कान्हेगाव परिसरात शोककळा पसरली आहे.

Visits: 196 Today: 2 Total: 2061155

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *