संगमनेर तालुक्याने ओलांडले बाधितांचे 31 वे शतक..! शहरातील दहा जणांसह एकुण एक्कावन्न जणांचे अहवाल पॉझिटिव्ह!!

संगमनेर तालुक्याने ओलांडले बाधितांचे 31 वे शतक..!
शहरातील दहा जणांसह एकुण एक्कावन्न जणांचे अहवाल पॉझिटिव्ह!!
अवघ्या 28 दिवसांत तालुक्याच्या रुग्णसंख्येत 1 हजार 418 रुग्णांची भर, सतरा जणांचे बळीही गेले!!!
नायक वृत्तसेवा, संगमनेर
दररोज वाढणारी रुग्णसंख्या आणि त्यात चालू महिन्यात वाढलेला मृत्युचा दर यामुळे संगमनेर तालुक्यातील कोविड स्थिती उच्चांकी पातळीवर पोहोचली आहे. या महिन्याभरात आत्तापर्यंत तालुक्याच्या एकुण रुग्णसंख्येत 1 हजार 418 रुग्णांची वाढ होण्यासोबतच मृतांच्या संख्येतही 17 जणांची भर पडली आहे. आजही हीच श्रृंखला कायम असून सप्टेंबर महिना रुग्णांच्या विक्रमी वाढीसह मृतांचा आकडा वाढवणारा ठरला आहे. त्यातच प्रशासनाकडून शासकीय व निमशासकीय सेवेतील अधिकारी व कर्मचार्‍यांच्याही चाचण्या सुरु करण्यात आल्याने तालुक्यातील रुग्णसंख्येत भर पडत आहे. आजही आरोग्य यंत्रणेमार्फत ठिकठिकाणच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांसह निमशासकीय कर्मचार्‍यांच्या रॅपिड अँटीजेन चाचण्या करण्यात आल्या, त्यासाठी 411 अँटीजेन किटचा वापर करण्यात आला. त्याशिवाय शासकीय प्रयोगशाळेकडून मिळालेल्या अहवालातून आज तालुक्याच्या रुग्णसंख्येत 51 जणांची भर पडली, आजच्याही बाधितांमध्ये शहरातील अवघे दहाजण आहेत. आजच्या रुग्णवाढीने तालुका 31 व्या शतकाच्या पल्याड गेला असून रुग्णसंख्या 3 हजार 138 झाली आहे.


उत्सवांचा महिना ठरलेल्या ऑगस्टमध्ये तालुक्यातील रुग्णसंख्येत 962 नवीन बाधितांची भर पडल्याने या महिन्याची सुरुवातच 1 हजार 720 इतकी मोठी रुग्णसंख्या सोबत घेवून झाली. बकरी ईद, रक्षाबंधन, कृष्णाष्टमी, गणेशोत्सव आणि मोहरम या सारख्या मोठ्या सार्वजनिक उत्सवांची रेलचेल असणार्‍या अॉगस्टमध्ये महिन्यातील सरासरी रुग्णवाढ अपेक्षेप्रमाणेच होत होती. मात्र शेवटच्या आठवड्यातील गणेशोत्सवात या सर्व अपेक्षा फोल ठरवताना शहरी रुग्णसंख्येला मागे सारीत ग्रामीणभागातील रुग्णसंख्या फुगण्यास सुरुवात झाली. आणि ऑगस्ट अखेर तालुक्याची बाधित संख्या 1 हजार 720 वर जावून थांबली. तोपर्यंत 26 जणांचे बळीही नोंदविले गेले होते.


या महिन्याची सुरुवात विघ्नहर्त्या गणरायाच्या उत्सवाच्या सांगतेने झाली, मात्र सायंकाळ होता होता या उत्सवाला शहरातील एकाच्या मृत्युसह 42 रुग्णांच्या अहवालाने गालबोट लावले. तीच श्रृंखला या महिन्याने आजवर सोबत ठेवली आहे. गेल्या 28 दिवसांमध्ये शहरातील तिघांसह तालुक्यातील तब्बल 17 जणांचा तर अन्य तालुक्यातील तिघांचा बळी गेला आणि तालुक्याच्या एकुण रुग्णसंख्येतही सरासरी 51 रुग्ण प्रति दिवसाच्या गतीने आज अखेर 1 हजार 418 रुग्णांचीही भर पडली. त्यामुळे हा महिना तालुक्याची रुग्णसंख्या उच्चांकी पातळीवर नेण्यासह तालुक्यातील कोविड मृतांची संख्याही वाढवणारा ठरला.


आज स्थानिक प्रशासनाने संगमनेर नगर पालिकेतील कर्मचार्‍यांसह विविध प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या कार्यकक्षेत रॅपिड अँटीजेन चाचण्या केल्या, त्यातून 49 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. तर शासकीय प्रयोगशाळेकडून दोघांचे असे एकुण 51 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले, त्यात शहरातील दहा जणांसह तालुक्यातील 41 जणांचा समावेश आहे. आज शासकीय प्रयोगशाळेकडून अवघे दोन जणांचे अहवाल प्राप्त झाले, त्यात सुकेवाडी येथील 64 वर्षीय महिला व बोटा येथील 60 वर्षीय इसमाचा अहवाल प्राप्त झाला आहे. उर्वरित 49 अहवाल रॅपिड अँटीजेन चाचणीद्वारे समोर आले असून त्यात शहरातील दहा जणांना संक्रमण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या चाचणीतून प्रवरा काठावरील साईनगर परिसरातून चार रुग्ण समोर आले असून यात 52 व 36 वर्षीय महिलांसह आठ वर्षीय बालिका आणि 42 वर्षीय तरुण,

वाढत्या रुग्ण संख्येतही आज अत्यंत दिलासादायक वार्ताही समोर आली आहे. आजच्या शासकीय कर्मचारी तपासणी मोहिमेत संगमनेर नगर परिषदेच्या सफाई कर्मचाऱ्यांसह जवळपास एकशे दहा जणांची रॅपिड अँटीजेन चाचणी करण्यात आली. आनंदाची गोष्ट म्हणजे गेल्या सहा महिन्यांंपासून प्रतिबंधित क्षेत्रासह शहरातील विविध रुग्णालये, त्यांचा परिसर व शहरातील रहिवाशी भागात दैनंदिन कचरा सफाईचे काम करूनही कोणत्याही सफाई कामगारास अथवा लॉकडाउन व अनलॉक प्रक्रियांमध्ये आपले जीव धोक्यात घालून रस्त्यावर उतरलेले पालिकेतील अन्य कर्मचारी यापैकी कोणीही बाधित असल्याचे समोर आले नाही. अर्थात आज केवळ तृतीय व चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांचीच चाचणी झाली. अद्याप मोठी संख्या बाकी आहे. उद्या पालिकेतील कार्यालयीन कामकाज करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची चाचणी केली जाणार आहे.

गणेशनगर परिसरातील 55 वर्षीय इसम, चैतन्यनगर परिसरातील 36 वर्षीय तरुण, शिवाजीनगर परिसरातील 42 वर्षीय महिला, कोष्टी गल्लीतील 38 वर्षीय तरुण, संगमनगर परिसरातील 18 वर्षीय तरुणीसह पंधरा वर्षीय बालक, तर ग्रामीण भागातील धांदरफळ खुर्द येथील 57 वर्षीय इसम, निमगाव पागा येथील 60 वर्षीय महिलेसह 42 वर्षीय तरुण, निमगाव टेंभी येथील 17 वर्षीय तरुण, झोळे येथील 75 वर्षीय महिलेसह 23 वर्षीय तरुण, घारगाव येथील 72, 70, 40, 39 व 37 वर्षीय महिलांसह 48 वर्षीय तरुण, चिखली येथील 70 वर्षीय महिलेसह 42 वर्षीय तरुण व 14 वर्षीय बालिका, निमगावजाळीतील 25 वर्षीय महिला, उंबरी बाळापूर येथील तीस वर्षीय तरुण, बोटा येथील 42 व 24 वर्षीय महिलांसह 31 व 29 वर्षीय तरुुण आणि पाच वर्षीय बालक, गुंजाळवाडीतील 65 व 37 वर्षीय इसमासह 31 व 18 वर्षीय महिला, घुलेवाडी येथील 29 वर्षीय महिला, वडगावपान मधील 27 वर्षीय महिलेसह 21 वर्षीय तरुण, सावरगाव तळ येथील 39 वर्षीय तरुण, जवळे बाळेश्वर 65 व 30 वर्षीय इसम, मालदाड येथील 50 वर्षीय इसमासह 19 वर्षीय तरुणी निमोण येथील 30 वर्षीय महिला आणि खळी पिंपरी येथील 50 वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव प्राप्त झाला आहे. आजच्या रुग्ण संख्येतही 51 जणांची भर पडल्याने तालुक्यातील बाधितांची संख्या एकतिसावे शतक ओलांडून 3 हजार 138 वर पोहोचली आहे.

सप्टेंबरने आत्तापर्यंत घेतले सतरा जणांचे बळी!
या महिन्यात आत्तापर्यंत तालुक्याच्या रुग्णसंख्येत 1 हजार 367 रुग्णांची भर पडण्यासोबतच तालुक्यातील 17 जणांचे बळीही गेले आहेत. यात शहरीभागातील तिघांचा तर ग्रामीणभागातील 14 जणांचा समावेश आहे. गेल्या 1 सप्टेंबरपासून शहरातील माळीवाड्यातील 70 वर्षीय इसम, पंपींग स्टेशन परिसरातील 73 वर्षीय महिला व गांधी चौकातील 70 वर्षीय इसमाचा तर समनापूर येथील 62 वर्षीय इसम, मालदाड येथील 35 वर्षीय तरुण, चंदनापूरी येथील 74 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 39 वर्षीय इसम, चिखली येथील 76 वर्षीय महिला, घुलेवाडी येथील 80 वर्षीय वयोवृद्ध नागरिक, हिवरगाव पठार येथील 70 व 55 वर्षीय इसम, वेल्हाळे येथील 65 वर्षीय इसम, मंगळापूर येथील 65 वर्षीय इसम, कौठे धांदरफळ येथील 55 वर्षीय इसम, मनोली येथील 70 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, निमगाव बुद्रुक येथील 64 वर्षीय इसम व सायखिंडीतील 40 वर्षीय तरुणाचा समावेश आहे. याशिवाय श्रीरामपूर तालुक्यातील एक व कोपरगाव तालुक्यातील दोघांचाही या महिन्यात संगमनेरातील खासगी रुग्णालयात मृत्यु झाला आहे.

जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 89.33 टक्के..
जिल्ह्यातील कोविड रुग्णांच्या संख्येत दररोज भर पडत आहे. मात्र त्याचवेळी जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या कोविड केअर आणि कोविड हेल्थ सेंटर मधून रुग्ण बरे होवून घरी परतणार्‍यांची संख्याही रोज नवनवीन विक्रम नोंदवित आहे. आजही जिल्ह्यातील 856 रुग्णांना उपचारांती घरी सोडण्यात आले. त्यामुळे आता जिल्ह्यात उपचार पूर्ण करुन घरी परतणार्‍या रुग्णांची एकुण संख्या 37 हजार 531 झाली आहे. सकाळच्या सत्रात जिल्ह्याच्या रुग्णसंख्येत 53 नवीन रुग्णही वाढले आहेत.


आज घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांमध्ये अहमदनगर महापालिका क्षेत्रातील 235, संगमनेर 74, राहाता व राहुरी प्रत्येकी 54, जामखेड 47, पारनेर 44, कोपरगाव 43, अकोले व श्रीरामपूर प्रत्येकी 42, नगर तालुका व नेवासा प्रत्येकी 39, पाथर्डी 35, शेवगाव 29, श्रीगोंदा 24, लष्करी रुग्णालय 21, लष्करी परिसरातील 11 व अन्य जिल्ह्यातील दोघांचा समावेश आहे.

अहमदनगर जिल्ह्यात आज तब्बल ८५६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता जिल्ह्यातील बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३७ हजार ५३१ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण ८८.१९ टक्के झाले आहे. गेल्या चोवीस तासात जिल्ह्याच्या ररु संख्येत ६०० बाधितांची नव्याने भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यात उपचार सुरु असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ४ हजार ३३४ झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोविड १९ तपासणी प्रयोगशाळेत ७८, खाजगी प्रयोगशाळेत १०७ आणि रॅपिड अँटीजेन चाचणीत ४१५ रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या प्रयोगशाळेत केलेल्या चाचणीतून अहमदनगर महापालिका क्षेत्रातील ३४, अकोले १४, जामखेड ०१, कर्जत ०२, नगर ग्रामीण ११, नेवासा ०४, पारनेर ०३, संगमनेर ०२, शेवगाव ०१, श्रीगोंदा ०२, श्रीरामपूर ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत अहमदनगर महापालिका ३१, अकोले ०३, जामखेड ०३, कोपरगाव ०५, नगर ग्रामीण ०९, नेवासा ०४, पारनेर ०४, पाथर्डी ०५, राहाता १२, राहुरी ०९, शेवगाव ०६, श्रीरामपूर १२ अशा रुग्णांचा समावेश आहे.

रॅपिड अँटीजेन चाचणीत आज ४१५ जण बाधित आढळुन आले. यामध्ये, अहमदनगर महापालिका क्षेत्र २३, अकोले ४५, जामखेड ३१, कर्जत ३३, कोपरगाव २६, नेवासा ३६, पारनेर २७, पाथर्डी १५, राहाता ५६, राहुरी १२, संगमनेर ४९, शेवगाव १४, श्रीगोंदा १३, श्रीरामपूर ३० आणि लष्करी परिसर ०८ अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज ८५६ रुग्णांना बरे झाल्यामुळे डिस्चार्ज मिळाला. यामध्ये अहमदनगर महापालिका क्षेत्र २३५, अकोले ४२, जामखेड ४७, कर्जत २१, कोपरगाव ४३, नगर ग्रामीण ३९, नेवासा ३९, पारनेर ४४, पाथर्डी ३५, राहाता ५४, राहुरी ५४, संगमनेर ७४, शेवगाव २९, श्रीगोंदा २४, श्रीरामपूर ४२, लष्करी परिसर ११, लष्करी रुग्णालय २१ आणि इतर जिल्हा ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.

  • जिल्ह्यात बरे झालेल्या रुग्णांची संख्या : ३७ हजार ५३१..
  • जिल्ह्यात उपचार सुरू असलेले रूग्ण : ४ हजार ३३४..
  • जिल्ह्यातील आजवरचे एकूण मृत्यू : ६९४..
  • जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या: ४२ हजार ५५९..
  • आतापर्यंत ३७ हजार ५३१ रुग्ण बरे होऊन घरी परतले..
  • जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सरसरी ८८.१९ टक्के..
  • जिल्ह्यात आज तब्बल ८५६ रुग्णांना मिळाला डिस्चार्ज तर ६०० बाधितांची नव्याने पडली भर..

Visits: 152 Today: 5 Total: 1107003

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *