कोपरेत महिलांनी सरपंचासह ग्रामसेवकाला कार्यालयात कोंडले मुसळवाडीसह 9 गाव प्रादेशिक पाणी योजना त्वरीत सुरू करण्याची मागणी

नायक वृत्तसेवा, राहुरी
मुसळवाडीसह 9 गाव प्रादेशिक पाणी योजना त्वरीत सुरू करावी या मागणीसाठी राहुरी तालुक्यातील कोपरे-शेणवडगाव गट ग्रामपंचायतीवर महिलांनी हल्लाबोल करत महिला सरपंचांसह ग्रामसेवक, ग्रामपंचायत पदाधिकार्यांना कार्यालयात कोंडून घेऊन टाळे ठोकले. दरम्यान तोंडी आश्वासनानंतर महिलांनी आपले आंदोलन मागे घेतले.

राहुरी तालुक्यातील मुसळवाडीसह मालुंजे खुर्द, माहेगाव, खुडसरगाव, पाथरे, कोपरे, शेणवडगाव, वांजुळपोई, तिळापूर आदी गावांची पिण्याची प्रादेशिक पाणी योजना गेल्या अनेक दिवसांपासून बंद आहे. आता उन्हाळा सुरू झाल्याने पाण्यासाठी महिलांना भटकंती करावी लागत आहे. अनेकदा मागणी करूनही ही योजना सुरू न झाल्याने मंगळवारी (ता.15) संतप्त महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयावर हल्लाबोल केला. कार्यालयात बसलेल्या महिला सरपंच कविता जाधव, उपसरपंच प्रियंका जाधव, सतीश साठे, शनेश्वर मोरे, विक्रम गिरी, बाबासाहेब मोरे, नानासाहेब जाधव, नानासाहेब जगताप, गमाजी जगताप, लक्ष्मण जगताप, गयाबाई घोडके, गयाबाई जगताप, ग्रामसेवक सचिन येमूल आदिंना कार्यालयात कोंडून घेत टाळे ठोकण्यात आले.

दरम्यान पदाधिकार्यांच्या आश्वासनानंतर महिलांनी आपले आंदोलन मागे घेतले. लीलाबाई मोरे, मंगल कुराडे, मंगल साठे, आशाबाई गायकवाड, नंदा मोरे, प्रतिभा गायकवाड, जिजाबाई मोरे, सरला शिंगवे, कुसुम वैरागर, वैशाली गिरी, कडूबाई गिरी, जगताप वंदना, गायकवाड मनीषा, साठे जिजाबाई आदिंसह महिला आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.
