संगमनेरच्या मालपाणी नगरमध्ये धाडशी घरफोडी! बंगल्याचे कुलुप तोडून प्रवेश; साडेसहा लाखांचे दागिने गायब..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेल्याकाही काळात शहरातील गुन्हेगारी घटनांमध्ये एकसारखी वाढ होत असताना त्यात आता घरफोड्यांच्या घटनांचाही समावेश होवू लागला आहे. पोलिसांच्या निष्क्रियतेचा पूर्ण फायदा घेत शहरात धुडगूस घालणार्‍या चोरट्यांनी आता उपनगरांमध्येही पाय पसरायला सुरुवात केली असून उच्चभ्रु वसाहतीचा परिसर म्हणून ओळखल्या जाणार्‍या मालपाणी नगरमधून त्याची सुरुवात झाली आहे. सोमवारी पहाटे या परिसरातील गल्ली क्रमांक दोनमधील बंद असलेल्या एका बंगल्याला चोरट्यांनी लक्ष्य करीत आंत प्रवेश केला व यथेच्छ धुडगूस घालीत साडेसहा लाखांचे मूल्य असलेल्या 54 ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांसह पोबारा केला. या घटनेने उपनगरांमधील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांकडून गस्त वाढवण्याची मागणी होत आहे.


याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदरचा प्रकार रविवारी रात्री शहरालगतच्या अतिशय उच्चभ्रु समजल्या जाणार्‍या मालपाणीनगरमध्ये घडला. या परिसरातील सुमतीनगरच्या गल्ली क्रमांक दोनमध्ये वास्तव्यास असलेले सचिन संपत जोंधळे आपल्या कुटुंबासह गावाला गेले होते. त्याचा फायदा घेत चोरट्यांनी त्यांच्या बंगल्याचा दर्शनी दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. आंत जावून चोरट्यांनी यथेच्छ धुडगूस घालताना मोठ्या प्रमाणात उचकापाचकही केली. यावेळी चोरट्यांनी शयनकक्षातील कपाट उघडून त्यात ठेवलेल्या प्रत्येकी 30 आणि 17 ग्रॅम वजनाच्या दोन गंठणसह पाच ग्रॅम वजनाची अंगठी आणि दोन ग्रॅमचे डूल असे एकूण 54 ग्रॅम वजन असलेले आणि आजच्या बाजारभावाने साडेसहा लाखांचे मूल्य असलेले सोन्याचे दागिने घेवून पोबारा केला.


सदरचा प्रकार सोमवारी (ता.14) सकाळी लक्षात आल्यानंतर पोलिसांना कळविण्यात आले. पोलीस उपाधिक्षक कुणाल सोनवणे, पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख आदींनी घटनास्थळी जावून पाहणी केली व तपास अधिकार्‍यांना आवश्यक सूचना दिल्या. दुपारनंतर ठसेतज्ञांसह श्‍वानपथकालाही पाचारण करण्यात आले होते. मात्र त्याचा फारसा उपयोग झाला नाही. गेल्याकाही कालावधीत शहरातील गुन्हेगारी घटनांचा आलेख वाढत असून बसस्थानकाचा परिसर तर दागिने ओरबाडणार्‍यांचा अड्डाच बनले होते. मात्र या घटनेने चोरट्यांकडून आता उपनगरांमधील सुखवस्तू कुटुंबही हेरण्यास सुरुवात झाली असून उपनगरीय रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी आपली निष्क्रियता झटकून नागरिकांना दिलासा देण्याची गरज आहे. या प्रकरणी अज्ञात चोरट्या विरोधात भारतीय न्यायसंहितेच्या कलम 331 (4) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उपनिरीक्षक सावंत यांच्याकडे देण्यात आला आहे.

Visits: 190 Today: 7 Total: 1099789

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *