संगमनेर तालुक्यातील माजी सभापतींंचा आत्महत्येचा प्रयत्न..! कौटुंबिक वादातून घडलेला प्रकार; राजकीय वर्तुळात मात्र खळबळ..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेरच्या राजकीय क्षेत्रात महत्त्वाचा घटक असलेल्या एका संस्थेच्या माजी महिला सभापतीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. आज दुपारच्यावेळी ग्रामीण भागात घडलेल्या या घटनेने तालुक्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात कोणतीही नोंद झालेली नसून संबंधित महिलेवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सदरची घटना कौटुंबिक वादातून घडल्याचे माहिती विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यातील ग्रामीण भागातील एका माजी महिला सभापतीने आज (ता.6) सकाळी कौटुंबिक कलहातून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. संबंधित महिलेच्या दिराचा मृत्यू झालेला असून त्यांंच्या विधवा पत्नीच्या वाट्याला आलेल्या शेतजमिनीत कसायला कोणीही नसल्याने त्यांचे भाऊ सदर जमिनीत मेहनत करीत होते. त्याचवेळी ‘तुमचा काय संबंध’ या शब्दावरून वादाची ठिणगी पडली आणि त्यातून आपल्या बहिणीच्या मदतीसाठी शेतीत काम करणाऱ्या ‘त्या’ दोन्ही भावांना संबंधित सभापतीच्या पतीने शिवीगाळ करीत मारहाण केली. इतक्या महत्त्वाच्या पदावर काम केलेल्या महिलेच्या घरातच असा प्रकार झाल्याने व त्याची चर्चा गावभर पसरल्याने इंभ्रतीचा पंचनामा नको म्हणून विष प्राशन करण्याचा प्रकार घडल्याची चर्चा आहे.

या वादावर तोडगा काढण्यासाठी आज दुपारच्या वेळी संबंधित माजी सभापतींच्या गावात काही ज्येष्ठांसह प्रतिष्ठित नागरिकांनी एकत्रित येऊन यावर तोडगा काढण्याचाही प्रयत्न केला, मात्र त्यातून काहीही निष्पन्न झाल्याचे वृत्त नाही. याप्रकरणी तालुका पोलिसांशी संपर्क साधून माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता सदरचा प्रकार त्यांच्यापर्यंत पोहोचलाच नसल्याचे समजले. सदर महिला सभापतींंवर शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असून त्यांची प्रकृती धोक्याच्या पातळी बाहेर असल्याची माहिती त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिली आहे. या वृत्ताने संपूर्ण संगमनेर तालुक्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Visits: 199 Today: 1 Total: 1101703
