धक्कादायक; एकाच कुटुंबातील तिघांची गळफास घेऊन आत्महत्या! केडगाव येथील घटना; आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज

नायक वृत्तसेवा, नगर
केडगाव येथील एकाच कुटुंबातील तिघांनी गळफास लावून घेत आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. आर्थिक विवंचनेतून ही घटना घडल्याचे प्राथमिक चौकशीतून पुढे आले आहे. आधी मुलीला गळफास देऊन नंतर पती-पत्नीने गळफास लावून घेतल्याचा अंदाज आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांना चिठ्ठीही सापडली आहे. मात्र, अधिक तपशील मिळू शकला नाही.

केडगावमधील मोहिनीनगर भागात राहणारे व्यावसायिक संदीप दिनकर फाटक (वय 45), किरण संदीप फाटक (वय 32) व मैथिली संदीप फाटक (वय 10) हे तिघे घरात गळफास लावून घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. सोमवारी (ता.6) सकाळी शेजार्यांच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर त्यांनी पोलिसांना कळविले. कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक राकेश मानगावकर आपल्या पथकासह तेथे दाखल झाले आहेत. त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन पुढील कार्यवाही सुरू केली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार फाटक यांची केडगाव ही सासूरवाडी आहे. केडगावदेवी भागातील ठुबे मळ्यात अलीकडेच ते रहायला गेले होते. कोंडीराम वीरकर हे त्यांचे सासरे होत. रात्री फाटक कुटुंबाचे नातेवाईकांशी दूरध्वनीवरून बोलणेही झाले होते. सकाळी बराच काळ प्रतिसाद न मिळाल्याने शेजारी तसेच सासुरवाडीच्या लोकांनी घरी जाऊन पाहिले असता तिघेही गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. फाटक गेल्या काही काळापासून आर्थिक विवंचनेत होते. त्यातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. पोलिसांनी तिघांचेही मृतदेह ताब्यात घेतले असून जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले आहेत. तेथे शवविच्छेदन केल्यानंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहेत. घटनास्थळी सापडलेली चिठ्ठीही पोलिसांना ताब्यात घेतल्याचे सांगण्यात येते.
