गणेशोत्सवात पर्यावरणपूरक मूर्तींची प्रतिष्ठापना करा! संगमनेरातील पर्यावरणप्रेमी व मूर्तीकारांचे गणेशभक्तांना आवाहन

नायक वृत्तसेवा, संगमनेर
येत्या 10 सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला सुरूवात होणार आहे. तत्पूर्वी केंद्र व राज्य सरकारने प्लॅस्टर ऑफ पॅरीसच्या मूर्तींची निर्मिती व विक्री करण्यावर बंदी घातलेली आहे. यातून पर्यावरणाची हानी होत असल्याने प्रत्येकवेळी सरकार व स्वयंसेवी संस्था पर्यावरणपूरक मूर्ती बसविण्याबाबत आग्रह करतात. तरी देखील पीओपी गणेश मूर्तींची सर्रासपणे निर्मिती व विक्री होत असल्याचे आढळून येते. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने वेळीच जनजागृती करुन अंमलबजावणी करण्याच्या हेतूने पावले उचलावी अशी मागणी संगमनेरातील पर्यावरणप्रेमी आणि मूर्तीकारांतून जोर धरु लागली आहे.

दरवर्षी गणेशोत्सव मोठ्या आनंदात साजरा होतो. प्रबोधनात्मक आरस निर्मिती, मनोरंजन आणि विविध उपक्रम राबविले जातात. परंतु, गेल्या दीड वर्षापासून कोविडचे संकट आलेले असल्याने उत्सवार अनेक निर्बंध आलेले आहेत. त्यातच कोरोना महामारीमध्ये पर्यावरणाचे महत्त्व अधोरेखित झाले असून, स्वच्छतेला देखील अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेले आहे. या पार्श्वभूमीवर सरकार व स्वयंसेवी संस्था पर्यावरणपूरक शाडू व लाल मातीपासून गणेश मूर्तींची निर्मिती व विक्री करण्याचे आवाहन करत आहेत. मात्र, बाजारात मोठ्या प्रमाणात प्लॅस्टर ऑफ पॅरीसपासून तयार झालेल्या मूर्त्या विक्रीस उपलब्ध होतात. त्यांचे विसर्जन नदी व साठवण तलावांत होत असल्याने जल प्रदूषण होते.

केंद्र सरकारनेच पीओपी मूर्तीवर आधीच बंदी जाहीर केलेली आहे. त्यामुळे याची प्रभावी अंमलबजावणी राज्यात व्हावी अशी मागणी गणेशभक्तांनी व पर्यावरणप्रेमींनी केलेली आहे. त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांनी देखील कडक पावले उचललेली आहेत. तत्पूर्वी पर्यावरणपूरक गणेश मूर्तींबाबत वेगवेगळ्या माध्यमातून जनजागृती करावी. तसेच महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने 29 जून, 2021 रोजी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी केलेल्या आहेत. त्यामध्ये सार्वजनिक मंडळासाठी चार फूट व घरगुती गणपतीकरिता दोन फूट उंचीची मर्यादा आहे. यामध्ये गणेश मूर्ती शाडूची अर्थात पर्यावरणपूरक असावी व तिचे घरीच विसर्जन करावे, म्हणजे पर्यावरणाची हानी होणार नाही अशा सूचना दिलेल्या आहेत. त्याची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे आवाहनही करण्यात आलेले आहे. संगमनेर शहरातही लिबर्टी अर्थवेअर आर्टसह इतर मूर्तीकारांनी शाडू व लाल मातीच्या गणेश मूर्ती विविध रुपांत आणि आकर्षक रंगांत पीओपीच्या दरातच बाजारात उपलब्ध केलेल्या आहेत. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव शाडू मातीच्या मूर्तीसंगे साजरा करावा असे आवाहन मूर्तीकारांनी केले आहे.

धर्मशास्त्रानुसार हिंदू शास्त्र संमत देव-देवतांच्या धार्मिक विधीतील पूजेसाठी मातीच्याच मूर्ती असाव्यात. ज्या मूर्तींचे विसर्जन केले जाते त्या पार्थिव व मातीच्या असाव्यात असे अपेक्षित आहे. म्हणून गणेशभक्तांनी लाल व शाडू मातीच्या पर्यावरण पूरक मूर्तींची प्रतिष्ठापना करावी.
– सदाशिव मुळे, संगमनेर

