‘वाट चालताना’ हे पुस्तक समाजाला दिशादर्शक ः डॉ. मालपाणी डॉ. संतोष खेडलेकर यांच्या पुस्तकाचे दिमाखदार प्रकाशन


नायक वृत्तसेवा, संगमनेर
वाट चालताना या पुस्तकात संतोष खेडलेकर यांनी उत्तमचंदजी सरनोत यांचे केलेले व्यक्तिचित्रण म्हणजे एका खर्‍याखुर्‍या कर्मयोगी व्यक्तिमत्वाच्या आयुष्याचा पट आहे. त्यामुळे हे पुस्तक समाजाला दिशादर्शक ठरेल असे प्रतिपादन ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ आणि गीता परिवाराचे कार्याध्यक्ष डॉ. संजय मालपाणी यांनी केले.

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य डॉ. संतोष खेडलेकर यांनी लिहिलेल्या ‘वाट चालताना’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी अहमदनगर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनी विखे प्रमुख अतिथी म्हणून व्यासपीठावर उपस्थित होत्या. लोणी (ता. राहाता) येथील उत्तमचंद सरनोत यांच्या आयुष्यावर आधारित ‘वाट चालताना’ हे चरित्रात्मक पुस्तक डॉ. खेडलेकर यांनी नुकतेच लिहिले. एका व्यापारी माणसाच्या आयुष्यातील खडतर संघर्ष टिपताना त्यांनी प्रामाणिकपणा, सचोटी, ग्राहकाभिमुखता या त्रिसूत्रीच्या आधारे मिळवलेले यश अधोरेखित करणार्‍या या पुस्तकचा प्रकाशन सोहळा नुकताच येथील मालपाणी क्लब आणि रिसोर्टमध्ये झाला.

याप्रसंगी बोलताना शालिनी विखे यांनी सरनोत आणि विखे परिवाराच्या तीन पिढ्यांच्या ऋणानुबंधाच्या आठवणींना उजाळा दिला. याच कार्यक्रमात उत्तमचंदजी यांच्या सहस्रचंद्रदर्शन सोहळ्याचेही आयोजन करण्यात आले होते. यावेळी सरनोत परिवारातील ज्येष्ठ सदस्य रतनचंदजी सरनोत हेही व्यासपीठावर उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. डॉ. अनुश्री खैरे यांनी केले. प्रास्तविक सुनीता सरनोत यांनी केले तर डॉ. महावीर सरनोत यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजकुमार गांधी, संजय सरनोत आदिंनी विशेष परिश्रम घेतले.

Visits: 137 Today: 1 Total: 1102187

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *