अहमदनगर जिल्ह्यातील रुग्णवाढीचा वेग आजही कायम! अकोले तालुक्यात आज कोविडची रुग्णसंख्या वाढली; 63 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह
नायक वृत्तसेवा, संगमनेर
जिल्ह्यात सुरू असलेला कोविडचा प्रादुर्भाव आजही भराला असून रोजच्या सरासरीनुसार जिल्ह्याच्या एकूण रुग्णसंख्येत आज तब्बल 1 हजार 319 रुग्णांची भर पडली आहे. आजच्या अहवालातून जिल्ह्यातील सर्वाधिक रुग्णवाढ होणार्या क्षेत्रात अहमदनगर महापालिका क्षेत्राचे स्थान कायम असून संगमनेर तालुका पाचव्या स्थानावर गेला आहे. त्यामुळे आज संगमनेरकरांना काहीसा दिलासा मिळाला तर अकोल्यातील रुग्णसंख्येने आज उसळी मारल्याचेही समोर आले आहे. आज प्राप्त झालेल्या अहवालातून संगमनेर तालुक्यात 64 तर अकोले तालुक्यात 63 रुग्ण आढळून आले आहेत. आजच्या रुग्णवाढीने संगमनेर तालुक्याची एकूण रुग्णसंख्या आता 8 हजार 633 झाली आहे.
जिल्ह्याच्या कोविड संक्रमणाची गती वाढवणार्या मार्चमध्ये रुग्णसंख्येचे विक्रम नोंदविल्यानंतर आता तोच कित्ता एप्रिलच्या पहिल्याच दिवसाने गिरवला आहे. रोजच्या सरासरीनुसार आजही जिल्ह्यातून 1 हजार 319 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून त्यात सर्वाधिक 362 रुग्ण अहमदनगर महापालिका क्षेत्रातून समोर आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून राहाता व संगमनेर तालुक्यात अहमदनगरच्या खालोखाल रुग्णवाढ होत असल्याचे समोर आले होते. आज मात्र या दोन्ही तालुक्यांना क्षणिक दिलासा मिळाला असून चौदा तालुक्यांमध्ये आज झालेल्या रुग्णवाढीत संगमनेर तालुका सहाव्या तर राहाता तालुका आठव्या स्थानावार आहे. राहाता तालुक्याची जागा आज कोपरगाव तालुक्याने घेतली असून तेथून 144 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
त्या खोलाखाल असलेल्या संगमनेरच्या जागी आज नेवाशाने उसळी घेतली असून तेथील शंभर जणांना कोविडचे संक्रमण झाले आहे. श्रीरामपूर तालुक्याने आजही रुग्णवाढीतील आपले स्थान कायम राखले असून तेथून 91 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. पाथर्डी येथील 65, संगमनेर 64, अकोले 63, राहाता 63, नगर ग्रामीण 58, शेवगाव 53, राहुरी 51, कर्जत 50, लष्करी परिसरातून 39, श्रीगोंदा 34, जामखेड 32, पारनेर 28 लष्करी रुग्णालय 2 तर अन्य जिल्हा व राज्यातील तब्बल 20 जणांचे अहवालही आज पॉझिटिव्ह मिळाले आहेत. रुग्णवाढीचा वेग आजही अबाधित राहिल्याने जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या आता एक लाखांच्या दिशेने मार्गक्रमण करु लागली असून आज ती 96 हजार 241 झाली आहे.
आजच्या अहवालातून संगमनेर तालुक्यातील रुग्णसंख्येत घट झाल्याचे दिसत आहेत, मात्र आज खासगी प्रयोगशाळांकडून अनेकांचे अहवाल अप्राप्त असल्याने तालुक्यातील रुग्णसंख्या खालावली असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे संगमनेरकरांना आज मिळालेला दिलासा क्षणिक असल्याचेही स्पष्ट आहे. आज प्राप्त झालेल्या संगमनेर तालुक्याच्या एकूण 64 अहवालातील 48 अहवाल शासकीय प्रयोगशाळेकडून, अवघे दहा अहवाल खासगी प्रयोगशाळेकडून तर सहा अहवाल रॅपीड अँटीजेन चाचणीद्वारा समोर आले आहेत. त्यामुळे तालुक्याच्या रुग्णसंख्येत आजही भर पडून रुग्णसंख्या आता 8 हजार 633 झाली आहे.
आज अकोले तालुक्यातही कोविडने पुन्हा उसळी घेतली असून तेथून तब्बल 63 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. अकोल्यातील 36 जणांचे अहवाल शासकीय प्रयोगशाळेकडून, अवघा एक अहवाल खासगी प्रयोगशाळेकडून तर 26 जणांचे अहवाल रॅपीड अँटीजेन चाचणीद्वारा समोर आले आहेत. तर जिल्ह्यातील आजच्या एकूण 1 हजार 319 जणांच्या अहवालापैकी 447 अहवाल शासकीय प्रयोगशाळेकडून, 400 अहवाल खासगी प्रयोगशाळेकडून तर 472 जणांचे अहवाल रॅपीड अँटीजेन चाचणीद्वारा प्राप्त झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या आता 96 हजार 241 झाली आहे.