‘प्रवरा’च्या कामगाराला काळे फासल्याप्रकरणी गुन्हा दाखल

नायक वृत्तसेवा, राहुरी
प्रवरा साखर कारखान्याच्या एका अधिकार्‍याच्या तोंडाला काळे फासल्याप्रकरणी तनपुरे साखर कारखान्याच्या आंदोलक कामगारांवर राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राहुरी फॅक्टरी येथे तनपुरे साखर कारखान्याचे दोनशे कामगार मागील पाच वर्षातील थकीत वेतन व इतर 25 कोटी 36 लाखांच्या मागणीसाठी बारा दिवसांपासून उपोषण व धरणे आंदोलन करीत आहेत. बुधवारी (ता.1) आंदोलक कामगारांनी प्रवरा कारखान्याच्या कामगारांना कारखान्यात व संलग्न संस्थेमध्ये कामावर येऊ नये. अन्यथा आंदोलन तीव्र केले जाईल. असा इशारा दिला होता. परंतु, गुरुवारी (ता.2) प्रवरा कारखान्याच्या अकाऊंट विभागातील अधिकारी अविनाश खर्डे विवेकानंद नर्सिंग होम येथे कामावर आले. त्यामुळे संतप्त कामगारांनी त्यांच्या चेहर्‍याला काळे फासले. याप्रकरणी खर्डे यांनी लोणी पोलीस ठाण्यात दिलेल्या जबाबात म्हंटले की, गुरुवारी (ता.2) दुपारी पावणे बारा ते साडेबारा दरम्यान नर्सिंग होमच्या प्रांगणात असताना तनपुरे कारखान्याच्या कामगारांनी एकत्रित येऊन ‘तु जर इथे आला, तर तुझे हात-पाय कापून मारून टाकू’ अशी धमकी देऊन, आरोपींनी माझ्या अंगाला काहीतरी काळे लावून नुकसान केले आणि जीवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी तनपुरे साखर कारखान्याचे आंदोलक कामगार इंद्रभान पेरणे, सचिन काळे, सीताराम नालकर, नामदेव शिंदे, सुरेश तनपुरे, बाळासाहेब तारडे आदिंसह इतर कामगारांवर राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नीलेशकुमार वाघ हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *