संगमनेर नगरपालिकेचे मुख्याधिकारी राहुल वाघ यांची बदली! रामदास कोकरे नवे मुख्याधिकारी; पंकज गोसावींकडे अकोल्याचा भार..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
गणेशोत्सवाची सांगता होताच राज्यातील शासकीय अधिकार्‍यांच्या बदल्यांना पुन्हा एकदा वेग आला असून राज्य शासनाने आज शहरी प्रशासकीय सेवेतील मुख्याधिकारी श्रेणीतील तीस अधिकार्‍यांच्या बदल्यांचे आदेश काढले आहेत. त्यात संगमनेर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी राहुल वाघ यांची नंदूरबार नगरपरिषदेत बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी लातूर जिल्हा प्रशासनाचे सहआयुक्त रामदास कोकरे यांना पाठवण्यात आले आहे. तर, सध्या संगमनेरच्या मुख्याधिकार्‍यांकडेच अतिरीक्त पदभार असलेल्या अकोले नगरपंचायतीलाही आता पूर्णवेळ मुख्याधिकारी मिळाले असून पंकज गोसावी यांना तेथील भार सोपवण्यात आला आहे.


आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर भारत निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांच्या अनुषंगाने एका ठिकाणचा कार्यकाळ पूर्ण करणार्‍या शासकीय अधिकार्‍यांच्या बदल्यांना गणेशोत्सवापूर्वीच सुरुवात झाली होती. सुरुवातीला गृहविभागाने राज्यातील पोलीस अधिकार्‍यांच्या बदल्यांचे आदेश काढून त्यांना तत्काळ बदलीच्या ठिकाणी हजर होण्यास फर्मावले होते. त्यामुळे ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर संगमनेरचे पोलीस उपअधिक्षक सोमनाथ वाघचौरे आणि शहर पोलीस निरीक्षक भगवान मथुरे या दोघांचीही बदली झाल्याने गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलादच्या पार्श्‍वभूमीवर कायदा आणि व्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाला होता. या विषय समोर आल्यानंतर शासनाने गणेशोत्सवाच्या कालावधीत बदल्यांचे आदेश रोखले.


मात्र आता गणेशोत्सव आणि त्या पाठोपाठ ईद-ए-मिलाद हे दोन्ही सण शांततेत पार पडताच पुन्हा एकदा बदल्यांच्या प्रक्रियेला वेग दिला आहे. त्यानुसार आज राज्याच्या नगरविकास खात्याने शहरी प्रशासकीय सेवेतील मुख्याधिकारी श्रेणीतील तीस अधिकार्‍यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. त्यानुसार संगमनेर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी राहुल वाघ यांची नंदूरबार नगरपरिषदेत बदली झाली आहे. त्यांची जागी लातूरच्या जिल्हा प्रशासनाचे सहआयुक्त असलेल्या रामदास कोकरे यांची नियुक्ति करण्यात आली आहे. त्यासोबतच अकोले नगरपंचायतीलाही आता पूर्णवेळ मुख्याधिकारी मिळाले असून इगतपूरीचे मुख्याधिकारी पंकज गोसावी आता तेथील भार वाहणार आहेत. यासोबतच श्रीरामपूरचे मुख्याधिकारी सोमनाथ जाधव यांना जळगाव जिल्ह्यातील फैजपूर नगरपरिषदेत पाठवण्यात आले आहे. दौंडच्या मुख्याधिकारी सुषमा शिंदे आता अहमदनगर महापालिकेच्या उपायुक्त असतील.


सप्टेंबर 2021 मध्ये कोविड संक्रमणाची दुसरी लाट शिगेला असताना संगमनेर नगरपरिषदेचा पदभार स्वीकारणार्‍या राहुल वाघ यांनी दोन वर्ष नगराध्यक्षांसह संपूर्ण सभागृहाची कर्तव्य प्रशासक म्हणून अगदी निर्विघ्नपणे पार पाडले. या काळात अमरधामच्या सुशोभिकरण कामात झालेल्या गैरव्यवहारापासून ते सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प आणि म्हाळुंगी पुलावरुन रंगलेल्या राजकारणापर्यंतच्या प्रसंगांचा त्यांनी धैर्याने सामना केला. सत्ताधारी आणि विरोधक अशा दोहींना आपल्या मवाळ वाणीत गुंफून त्यांनी या सर्वांवर मात केली. या काळात प्रशासक म्हणून त्यांनी हाकलेला गावगाडा खरोखरी वाखाणण्या सारखाच राहीला. शासनाने त्यांच्या याच कामाची दखल घेत त्यांना नंदूरबारसारख्या प्रगत असलेल्या ‘अ’ वर्ग नगरपालिकेच्या मुख्याधिकारीपदी पाठवले आहे.

Visits: 89 Today: 1 Total: 113734

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *