घुलेवाडीच्या लोकनियुक्त सरपंचाचा 13 सप्टेंबरला फैसला विशेष ग्रामसभेचे आयोजन; राजकीय जाणकारांचे लागले लक्ष

नायक वृत्तसेवा, संगमनेर
तालुक्यातील राजकीय दृष्टीने अत्यंत महत्त्वाची समजली जाणारी घुलेवाडी ग्रामपंचायत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. घुलेवाडीचे लोकनियुक्त सरपंच सोपान राऊत यांच्या विरोधात ग्रामपंचायत सदस्यांनी दाखल केलेल्या ‘अविश्वास’ ठरावानंतर 5 जुलैला विशेष सभा बोलावण्यात आली होती. त्यात उपस्थित सतरा सदस्यांसह सरपंचांचे मतदान घेतल्यानंतर ठरावाच्या बाजूने सोळा मते पडल्याने अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला आहे. याबाबतचा सविस्तर अहवाल जिल्हाधिकार्‍यांना पाठविण्यात आला आहे. त्यावर येथील महात्मा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात 13 सप्टेंबर, 2021 रोजी सकाळी 9 वाजता विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती तहसीलदार अमोल निकम यांनी दिली आहे.

संगमनेर शहरालगतच असलेली घुलेवाडी ग्रामपंचायत महसुलाच्या बाबतीत तालुक्यात श्रीमंत समजली जाते. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्यासह अमृत उद्योग समूहाचे बहुतेक प्रकल्प, तालुका दूध संघ, कामगार वसाहत, संगमनेर महाविद्यालयासह विविध शैक्षणिक संस्था असलेल्या घुलेवाडीत संगमनेर शहरातील विस्तारीत वसाहतींचाही मोठ्या प्रमाणात सहभाग आहे. त्यामुळे राजकीय दृष्टीकोनातून तालुक्याच्या राजकारणात घुलेवाडीला अनन्य महत्त्व आहे. या ग्रामपंचायतवर महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे नेहमीच वर्चस्व राहिले आहे.

मागील मोठ्या कालावधीपासून घुलेवाडीचे लोकनियुक्त सरपंच सोपान राऊत यांच्याविरोधात सदस्यांमध्ये खद्खद् सुरु होती. त्याचे पर्यवसान अविश्वास ठराव आणण्यात झाले. त्यानुसार 5 जुलैला अध्यासी अधिकारी तथा संगमनेरचे तहसीलदार अमोल निकम यांच्या अध्यक्षतेखाली घुलेवाडी ग्रामपंचायतीची विशेष सभा बोलावण्यात आली होती. या सभेला सतरा सदस्यांसह सरपंच उपस्थित होते. यावेळी अविश्वास ठरावाच्या नोटीसमध्ये नमूद मुद्द्यांवर सर्वांची मते जाणून घेण्यात आली. सरपंच सोपान राऊत यांनीही आपली बाजू मांडली. त्यानंतर अविश्वास ठरावावर मतदान घेण्यात आले. यावेळी सोळा सदस्यांनी ठरावाच्या बाजूने तर अवघ्या दोघांनी ठरावाच्या विरोधात मतदान केले. ठरावाच्या बाजूने तीन चतुर्थांशपेक्षा अधिक मते असल्याने सदरचा अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला.

मात्र, सरपंच राऊत हे थेट जनतेतून निवडून आल्याने आज पार पडलेल्या विशेष सभेचा संपूर्ण अहवाल जिल्हाधिकार्‍यांना पाठविण्यात आला असून त्यांच्याकडील पुढील आदेशानुसार घुलेवाडीतील ग्रामसभेत याबाबत मतदानाची प्रक्रिया राबविली जाईल असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले आहे. त्यानुसार जिल्हाधिकार्‍यांनी 13 सप्टेंबर, 2021 ला विशेष ग्रामसभेचे आयोजन करुन आवश्यक असल्यास मतदान प्रक्रिया घेण्याचे आदेश बजावले आहे. येथील महात्मा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात ही प्रक्रिया पार पडणार आहे. यासाठी मतदारांनी निवडणूक आयोगाने विहीत केलेल्या ओळखपत्राचा पुरावा घेऊन यावा, असे आवाहन तहसीलदार अमोल निकम यांनी केले आहे. यावरच घुलेवाडीचे सरपंचपद रिक्त होईल किंवा नाही हे चित्र स्पष्ट होणार आहे. संगमनेर तालुक्याच्या राजकारणात घुलेवाडीचा नेहमीच वरचष्मा राहिला आहे. संगमनेर तालुक्यातील सर्वाधिक लोकसंख्या आणि महसूल असलेली ग्रामपंचायत अशी ओळख असलेल्या घुलेवाडीच्या लोकनियुक्त सरपंचांवर अविश्वास ठराव मंजूर झाल्याने तालुक्यासह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. अलिकडच्या काळात लोकनियुक्त पदाधिकार्‍यावर अशा पद्धतीने अविश्वास ठराव मंजूर होण्याची बहुधा ही पहिलीच वेळ असल्याने जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघाले आहे.

या सभेसाठी गणपूर्ती आवश्यक आहे, आवश्यक असल्यास मतदान प्रक्रिया गुप्त पद्धतीने होईल, 11 सप्टेंबर रोजी प्रसिद्ध होणारी मतदार यांदी अंतिम यादी असेल, ग्रामसभेत फक्त अविश्वास ठरावावरच चर्चा होईल, बहुमताने ठराव मंजूर झाला तरच अविश्वास ठराव मंजूर होईल, साध्या बहुमताने अविश्वास ठराव फेटाळला तर सरपंचपद कायम राहील असे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी आदेशात नमूद केलेले आहे.

Visits: 164 Today: 1 Total: 1573522

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *