नगर-मनमाड महामार्गाची दुरुस्ती करा; अन्यथा खड्ड्यांत गाडून घेऊ! रस्ता दुरुस्ती कृती समितीच्या युवकांचा निवेदनातून राहुरी प्रशासनाला इशारा

नायक वृत्तसेवा, राहुरी
नगर-मनमाड महामार्गाची सध्या अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. या पार्श्वभूमीवर हा महामार्ग तातडीने दुरुस्त करा, अन्यथा खड्ड्यांत गाडून घेऊ, असा इशारा रस्ता दुरुस्ती कृती समितीच्या युवकांनी राहुरी प्रशासनाला दिला आहे. दरम्यान, खड्डे बुजविण्यासाठी आलेले 10 कोटी गेले कुठे? असा सवालही नागरिकांनी केला आहे.

तहसीलदार फसियोद्दीन शेख यांना कृती समितीच्यावतीने रस्त्यावर पडलेले खड्डे डांबरीकरण करून बुजवा. अन्यथा आम्ही रस्त्यावरील खड्ड्यांत गाडून घेतो अशा आशयाचे निवेदन देण्यात आले आहे. गेल्या दोन वर्षांपासून नगर-मनमाड महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांच्या विरोधात आम्ही समितीच्या माध्यमातून विविध आंदोलने करत आहोत. दरवेळी आंदोलनानंतरच रस्त्यावर पडलेले खड्डे डांबरीकरण करून बुजविली गेली आहेत. मागील वर्षी सन 2020 रोजी सुद्धा याचप्रकारे आंदोलन झाल्यानंतर खड्डे बुजविण्यासाठी 10 कोटींच्या निधीची कामे झाल्याचे बोलण्यात येत होते. पण केवळ एका पावसातच हे 10 कोटी कसे काय वाहून गेले? हा प्रश्न आता नागरिकांना पडला आहे.
![]()
प्रत्येकी वर्षी पावसाळा आला की रस्त्यावर पुन्हा जीवघेणे खड्डे तयार होतात व ज्यामुळे अनेक निष्पाप नागरिकांचा बळी जातो. मागील वर्षी नगर-मनमाड मार्गाच्या पूर्ण निर्मितीसाठी 500 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. मार्च 2021 पर्यंत या रस्त्याचे काम सुरू होणार, अशी माहिती पसरविण्यात आलेली होती. मात्र, ऑगस्ट 2021 अखेर रस्त्याच्या कामाला सुरुवातही केली नाही. सद्यस्थितीत या महामार्गावर दररोज खड्ड्यांमुळे अपघात होत असून रोज कुणी ना कुणी या खड्ड्यांत पडून आपला जीव गमावत आहे. अथवा त्या नागरिकाला गंभीर स्वरूपाची दुखापतही होत आहे. पुढील 10 दिवसांत जर हे खड्डे व्यवस्थित डांबरीकरण करून बुजविले नाही तर या मार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे जर यापुढे अपघातात कुणाचा बळी गेला तर संबंधित ठेकेदाराविरुद्ध कृती समिती फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करणार आहे.

तसेच 11 सप्टेंबर रोजी रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात पडून विनाकारण जीव जाण्यापेक्षा कृती समितीचे कार्यकर्ते राहुरी फॅक्टरी येथे रस्त्याच्या कडेला खड्डे खोदून स्वतःला या खड्ड्यात अर्धे बुजवून घेतील व जोपर्यंत रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम सुरू करत नाही, तोपर्यंत या खड्ड्यांत या स्थितीत राहतील, असा इशारा देण्यात आला आहे. या निवेदनावर देवेंद्र लांबे, विराट कदम, श्रीकांत शर्मा, सतीश घुले अमोल वाळुंज, प्रमोद विधाटे, नसीब पठाण, रोहित नालकर, सचिन तारडे, तुषार कदम, प्रसाद कदम, सचिन कदम, नितीन मोरे, विठू राऊत, दुर्वेश वाणी, अमोल कदम, सुहास भांड, बाबासाहेब खांदे, सुजय पुजारी, संतोष कदम, शिवाजी पटारे आदिंच्या सह्या आहेत.
