आक्षेपार्ह मजकूर पोस्ट करणार्‍यांवर कारवाई करा! संगमनेर शिवसेनेची शहर पोलिसांकडे निवेदनाद्वारे मागणी..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
मनसुख हिरेण प्रकरणी माध्यमांमध्ये सुरू असलेल्या ‘मीडिया ट्रायल’चा आधार घेवून समाज माध्यमांमध्ये राज्याचे मुख्यमंत्री व परिवहन मंत्री यांच्या विरोधात आक्षेपार्ह मजकूर टाकणार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. संगमनेर शहर शिवसेनेच्यावतीने असे कृत्य करणार्‍या व्यक्तींवर कारवाईसोबतच भारतीय जनता पार्टीचे स्थानिक पदाधिकारी दीपक भगत यांच्यावर सायबर अ‍ॅक्टनुसार कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. या तक्रार अर्जाद्वारे अशा आक्षेपार्ह मजकुराला ‘लाईक’ करणारे विद्यार्थी असल्यास त्यांच्यावर मात्र कोणतीही कारवाई न करण्याचीही विनंती करण्यात आली आहे.

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेले वाहन सापडले होते. या घटनेचा तपास सध्या राष्ट्रीय तपास संस्था करीत आहे, तर सदरच्या वाहन मालकाच्या मृत्यूचा तपास राज्याचे दहशतवादी विरोधी पथक करीत आहे. दोन्ही घटनांचा तपास अद्यापही सुरु असतांना माध्यमांमध्ये त्याच्या जोरदार चर्चा आणि ‘मीडिया ट्रायल’ सुरु असतांनाच विरोधी पक्षातील काही उत्साही व्यक्तिंकडून मुख्यमंत्री व या प्रकरणात चर्चेत येणार्‍या राज्यमंडळातील अन्य सदस्यांची नावे व छायाचित्र वापरुन साशल माध्यमांमध्ये आक्षेपार्ह मजकूर टाकण्याची जणू स्पर्धाच लागली आहे.

संगमनेर भाजपचे पदाधिकारी दीपक भगत यांनीही सोशल माध्यमात राज्याचे मुख्यमंत्री व परिवहन मंत्री यांच्या विरोधात असाच आक्षेपार्ह मजकूर टाकल्याचा आरोप शहर शिवसेनेने केला आहे. त्यातून शिवसेना पक्षनेतृत्त्वाची बदनामी झाल्याचा आरोप करीत सेनेच्या स्थानिक पदाधिकार्‍यांनी शहर पोलीस ठाण्यात जावून पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांना निवेदन दिले असून संबंधितावर सायबर कलमांन्वये कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

सदरच्या मजकुराला काही विद्यार्थ्यांनी ‘लाईक’ अथवा ‘कमेंट’ केल्या आहेत. अशा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नये यासाठी त्यांना केवळ समज द्यावी व असे आक्षेपार्ह मजकूर पोस्ट करणार्‍या, लाईक अथवा कमेंट करणार्‍या अन्य राजकीय व्यक्तींवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. सदर निवेदनाच्या प्रति परिवहन मंत्री अनिल परब, गृहराज्यमंत्री शंभुराजे देसाई आणि अ‍ॅड.धरम मिश्रा यांना पाठविण्यात आल्या आहेत.

Visits: 120 Today: 2 Total: 1105543

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *