धारातीर्थी पडलेल्या कोविड योद्ध्याला पन्नास लाखांचा विमा! स्थानिक प्रशासनाच्या प्रयत्नांना ‘अखेर’ यश; डॉ.अमोल जंगम यांच्या पत्नीकडे मदत सुपूर्द..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेल्या सतरा महिन्यांपासून जगभरात थैमान घालणार्या कोविडने समाजातील अनेक रत्न हिरावून नेले. या संपूर्ण काळात देशभरातील आरोग्य विभागात काम करणार्या लाखो कर्मचार्यांनी आपले जीव धोक्यात घालून नागरिकांना वाचवण्याची शर्थ केली. त्यातून अनेकांना कोविडचे संक्रमण होवून त्यात त्यांचा मृत्यू झाला. संगमनेर तालुक्यातील धांदरफळ उपआरोग्य केंद्राचे समुदाय अधिकारी डॉ.अमोल जंगम यांचाही त्यात समावेश आहे. आपल्या कार्यक्षेत्रातील नागरिकांना कोविडपासून दूर ठेवण्याच्या प्रयत्नात हा योद्धा 5 मे, 2021 रोजी धारातीर्थी पडला होता. त्यांचे सहकारी अधिकारी व स्थानिक प्रशासनाने मोठ्या प्रयत्नातून राज्य सरकारला त्यांच्या बलिदानाचे महत्व पटवून देत त्यांच्या कुटुंबियांना पन्नास लाख रुपयांची मदत मिळवून दिली आहे. दिवंगत डॉ.जंगम यांच्या पत्नी अर्पणा यांच्या बँक खात्यात ही रक्कम वर्ग झाली आहे.
गेल्या वर्षी एप्रिलमध्ये संगमनेर तालुक्यात कोविड संक्रमणाचा चंचू प्रवेश झाला. त्यानंतरच्या दोन महिन्यात शहर आणि ग्रामीणभागात कोविडचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याने व त्यातच त्या काळात या महामारीबाबत फारशी माहिती उपलब्ध नसल्याने भीतीपोटी अनेक खासगी डॉक्टरच ‘स्वीच ऑफ’ होवून भूमिगत झाले होते. त्यामुळे सामान्य नागरिकांसाठी सरकारी आरोग्य व्यवस्था हा एकमेव पर्याय होता. अशा काळात घुलेवाडीच्या ग्रामीण रुग्णालयावरील ताण वाढल्याने संगमनेर नगर परिषद आणि स्थानिक प्रशासनाने पालिकेच्या जुन्या कॉटेज रुग्णालयात कोविड सेंटर सुरू करुन तेथील केनडी हॉलमध्ये शहरी भागातील रुग्णांसाठी चाळीस खाटांचे विलगीकरण केंद्र सुरू केले.
येथील रुग्णालयाची जबाबदारी निवृत्त वैद्यकीय अधिकारी डॉ.किशोर पोखरकर यांच्यावर सोपविण्यात आली. मात्र कॉटेजमध्ये कोविडच्या बाह्य रुग्ण विभागासह विलगीकरण कक्षही सुरू झाल्याने त्यांना साहाय्यक म्हणून समर्पित वृत्तीच्या सहकार्याची गरज होती. अशावेळी जवळ कडलग आरोग्य केंद्राच्या अंतर्गत असलेल्या धांदरफळ बु. उपआरोग्य केंद्राचे समुदाय आरोग्य अधिकारी (सी.एच.ओ.) डॉ.अमोल जंगम यांना विचारणा करण्यात आली. त्यांनी विनाविलंब त्याला होकार देत केनडी हॉलमधील कोविड बाधितांची जबाबदारी स्विकारली, तेव्हापासून ते गेल्या महिन्यापर्यंत ते येथेच कार्यरत होते. मात्र कोविडच्या दुसर्या लाटेने संपूर्ण तालुक्याची अवस्थाच बिकट झाल्याने त्यांना त्यांच्या मूळ नियुक्तीच्या ठिकाणी धांदरफळ बु. येथील केंद्रावर माघारी पाठविण्यात आले.
धांदरफळ येथील उपकेंद्रात दाखल झाल्यानंतर त्यांनी केवळ दिलेली जबाबदारीच न सांभाळता त्याही पुढे जावून माणसांसाठी, त्यांना जगवण्यासाठी जे करणं शक्य आहे ते करण्याचा प्रयत्न केला. या कालावधीत परिसरातील नागरिकांचे आरोग्य उत्तम रहावे, संक्रमणाचा वेग नियंत्रणात आणता यावा यासाठी ‘डॉक्टर आपल्या दारी’ या अभिनव उपक्रमातही त्यांचा सिंहाचा वाटा होता. संक्रमणापासून सुरक्षित राहण्यासाठी काय करावे व काय करु नये यासाठी त्यांनी जनजागृती अभियानात सहभाग घेवून लोकांमध्ये जागृतीचा कार्यक्रम राबविला. त्याचाच परिणाम अगदी संक्रमणाच्या सुरुवातीला त्यांच्या आरोग्य उपकेंद्राच्या अंतर्गत असलेल्या धांदरफळमध्ये कोविडचा उद्रेक होवून तालुक्यातील पहिला कोविड बळी जावूनही नंतरच्या कालावधीत हा संपूर्ण परिसर कोविड प्रादुर्भावाच्या बाबतीत नियंत्रणात आला.
याच दरम्यान 25 एप्रिल, 2021 रोजी डॉ.जंगम यांना कोविडची लागण झाली, त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांनी स्वतःला पालिकेच्या केनडी हॉलमध्येच संस्थात्मक विलगीकरण केले. या अल्पकालावधीत स्वतः रुग्ण असतानाही ते इतर रुग्णांना धीर देत, त्यांच्यात कोविड विरोधातील लढाई जिंकण्याची ऊर्जा भरण्याचे काम त्यांनी केले. मात्र या दरम्यान त्यांना झालेला संसर्ग अधिक पसरल्याने सुरुवातीला त्यांना डॉ.सुभाष मंडलिक यांच्या मंदना रुग्णालयात, नंतर डॉ.अतुल आरोटे यांच्या रुग्णालयात व शेवटी पुण्यातील नोव्हेल रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांची प्रकृती खालावतच गेल्याने 2 मे रोजी त्यांना कृत्रिम श्वसनयंत्र जोडण्यात आले. मात्र कोविडच्या अदृष्य विषाणूंशी लढतालढता त्यांची शारीरिक शक्ती क्षीण झाली होती. त्यातच सलग बारा महिने कोविडशी झुंज देत शेकडो नागरिकांना उपचार देवून ठिकठाक करणारा, जिंकण्याची उर्मी भरणारा, जागृती करणारा हा लढवय्या योद्धा 5 मे, 2021 रोजी धारातीर्थी पडला.
अतिशय सामान्य कुटुंबातील असलेले डॉ.अमोल जंगम अचानक मृत्यू पावल्याने संगमनेरच्या कोविड लढ्याला धक्का बसण्यासोबतच त्यांची आई, पत्नी, दोन मुले व लहान भाऊ यांच्या आयुष्यात अंधार पसरला. हा धक्का पचवून संगमनेरचे उपविभागाीय अधिकारी तथा प्रांताधिकारी डॉ.शशीकांत मंगरुळे, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.राजकुमार जर्हाड, इंन्सीडेंट कमांडर तथा तहसीलदार अमोल निकम, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.सुरेश घोलप, मुख्याधिकारी डॉ.सचिन बांगर, वैद्यकीय अधिकारी डॉ.संदीप कचेरिया, जगदिश पवार, किरण सातपुते, डॉ.संदीप लोहरे, डॉ.उषा नंदकर, डॉ.मच्छिंद्र साबळे, डॉ.रवींद्र ढेरंगे, डॉ.साकिब बागवान, डॉ.अनिल गुंजाळ, डॉ.संजय बोडके व डॉ.समीर अभंग या सर्वांनी सामूहिकपणे दिवंगत डॉ.अमोल जंगम यांच्या कुटुंबियांना राज्य सरकारचे 50 लाख रुपयांचे विमा कवच मिळवून देण्यासाठी अक्षरशः जीवाचे रान केले. आणि अखेर त्यांच्या या प्रयत्नांना यश मिळून बुधवारी (ता.1) शासनाकडून डॉ.जंगम यांच्या पत्नी अर्पणा यांच्या बँक खात्यात 50 लाख रुपयांची रक्कम वर्ग झाली. या रकमेतून डॉ.जंगमांसारख्या समर्पित आरोग्य अधिकार्याची जागा भरुन येणार नाही, मात्र त्यांच्या कुटुबियांच्या काही अडचणी दूर सारल्या जातील अशी भावनिक प्रतिक्रीया यावेळी डॉ.मंगरुळे यांनी दिली.
अतिशय सामान्य कुटुंबातील डॉ.अमोल जंगम यांनी संगमनेरच्या कोविड लढ्यात अगदी पहिल्या दिवसापासून समर्पित भावनेने सहभागी झाले होते. अवघ्या 38 वर्षांच्या धन्वंतरीच्या या पूजकाने वर्षभर नागरिकांची अविरत सेवा केली, अनेकांना मृत्यूच्या दारातून परत आणले. मात्र स्वतःच्या जगण्याच्या लढाईत मात्र ते अपयशी ठरले. त्यांच्या पश्चात आई, लहान भाऊ, पत्नी व सात वर्षांची मुलगी आणि तीन वर्षांचा मुलगा असा परिवार आहे. आरोग्य विभागातील त्यांचे सर्व सहकारी, अधिकारी व स्थानिक प्रशासनाने डॉ.जंगम यांच्या मृत्यू पश्चात त्यांच्या कुटुंबियांच्या पाठिशी ठाम उभे राहून त्यांना राज्य शासनाकडून धारातीर्थी पडलेल्या कोविड योद्ध्यांना दिली जाणारी 50 लाखांची मदत मिळवून दिल्याने शहरातून समाधान व्यक्त होत आहे.