लाभक्षेत्रासह पाणलोटात पावसाची पूर्णतः उघडीप! भंडारदर्‍याच्या विसर्गातही कपात; ओव्हरफ्लो होण्याची प्रतीक्षा लांबली


नायक वृत्तसेवा, अकोले
आज ओव्हरफ्लो होईल, उद्या होईल असे वेगवेगळे अंदाज वर्तविले जात असतानाच त्याला हूल देत आता चक्क पावसानेच विश्रांती घेतल्याने भंडारदरा धरण भरण्याचा दिवस पुन्हा एकदा लांबणीवर पडला आहे. रविवारपासून पाणलोटातील पावसाचा जोर पूर्णतः ओसरला असून आज सकाळी बहुतेक भागात सूर्यनारायणानेही दर्शन दिले आहे. त्यामुळे भंडारदरा धरणातून सोडण्यात येणार्‍या विसर्गात कपात करण्यात आली असून सकाळी ११ वाजता धरणातून १ हजार ३८० युसेक वेगाने पाणी सोडण्यात येत आहे. सध्या भंडारदरा धरणाचा पाणीसाठा ९४.८३ टयांवर पोहोचला असून अद्यापही धरणाने तांत्रिक पातळी गाठल्याचे अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेले नाही.

गेल्या महिन्याच्या मध्यात पाणलोटात जोरदार पुनरागमन करणार्‍या वरुणराजाने जिल्ह्यातील सर्वच धरणांमधील पाणीसाठा समाधानकारक अवस्थेत पोहोचवला आहे. मात्र त्याचवेळी धरणांच्या संपूर्ण लाभक्षेत्रात अपवाद वगळता पावसाची सरासरी जेमतेमच राहिल्याने बळीराजाच्या एका डोळ्यात हसू तर दुसर्‍या डोळ्यात अश्रू अशी स्थिती निर्माण झाली आहे. मुळा व भंडारदरा या धरणांच्या पाण्यावर जिल्ह्याची समृद्धी अवलंबून आहे. आजच्या स्थितीत या दोन्ही धरणांचा जलसाठा समाधानकारक असल्याने लाभक्षेत्राची चिंता मिटल्याचे समजले जाते. मात्र ज्या भागाला या धरणांचे पाणी पोहोचत नाही अशा ठिकाणच्या बळीराजाच्या चिंता मात्र वाढल्या आहेत. त्यातच ऑगस्टचा पहिला आठवडा संपूनही पाणलोट वगळता उर्वरीत जिल्ह्यात पाऊसच नसल्याने विचित्र स्थिती निर्माण झाली आहे.

९६ वर्षांपूर्वी लोकसेवत रुजू झालेला भंडारदर्‍याचा जलाशय बहुतेकवेळा १५ ऑगस्टपूर्वीच ओव्हर फ्लो होत असतो. यंदा पावसाचे आगमन लांबल्यानंतरही अवघ्या १५ दिवसांच्या पावसाने धरणाची परिस्थिती पालटली आणि भंडारदर्‍यासह खपाटीला गेलेल्या निळवंडे जलाशयाचा साठा कमालीचा फुगला. त्यातून भंडारदरा आणि निळवंडे ही दोन्ही धरणं एकामागोमाग ओव्हर फ्लो होतील अशीही एकवेळ स्थिती निर्माण झाली होती. मात्र गेल्या तीन दिवसांत पाणलोटातील पावसाचा जोर टप्प्याटप्प्याने कमी होवून आज (ता.७) सकाळपासून बहुतेक ठिकाणी लख्ख सूर्यप्रकाश पडल्याने आज-उद्यात भंडारदरा धरण ओव्हर फ्लो होण्याची अपेक्षा आता लांबली आहे. आज सकाळी सहा वाजता भंडारदर्‍यातून १ हजार ९४० युसेकने विसर्ग सोडला जात होता, मात्र पावसाने उघडीप दिल्याने धरणात होणार्‍या पाण्याची आवक कमी झाली झाल्याने धरण व्यवस्थापनाने धरणातून सोडण्यात येणारा विसर्गही कमी केला असून सकाळी ११ वाजता १ हजार ३८० युसेकने पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे.

मागील २४ तासांत भंडारदरा धरणात २४४ दशलक्ष घनफूट पाण्याची आवक झाली असून त्यातील १६५ दशलक्ष घनफूट पाणी सोडून देण्यात आले आहे. सकाळी ६ वाजता धरणाचा पाणीसाठा १० हजार ४६८ दशलक्ष घनफूटावर (९४.८३ टक्के) स्थिरावला होता. तर निळवंडे धरणाचा पाणीसाठाही आता ८३.२४ टक्के झाला असून धरणात ६ हजार ९३५ दशलक्ष घनफूट पाणी जमा झाले आहे. गेल्या २४ तासांत धरणात ३०३ दशलक्ष घनफूट नवीन पाणी दाखल झाले असून त्यातील २५६ दशलक्ष घनफूट पाणी प्रवरापात्रातून सोडण्यात आले आहे. सध्या धरणातून ३ हजार ३९५ युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सोडला जात आहे. आढळा धरणाच्या पाणलोटातही पावसाने पूर्णतः उघडीप दिली असून रविवार बिताका डोंगरावर कोसळलेल्या पावसाने या धरणाच्या पाणीसाठ्यात १२ दशलक्ष घनफूटाची भर घालून पाणीसाठा ८५३ दशलक्ष घनफूटावर (८०.४७ टक्के) पोहोचवला आहे. एकंदरीत पाणलोटातील पाऊस थांबल्याने धरणे भरण्यासाठी आणखी काहीकाळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.


गेल्या २४ तासांत नोंदविलेला पाऊस..
भंडारदरा २३ मिमी., घाटघर ३३ मिमी., पांजरे २७ मिमी., रतनवाडी ३१ मिमी., वाकी १७ मिमी., निळवंडे २ मिमी.

Visits: 89 Today: 1 Total: 429189

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *