नागपंचमीनिमित्त अकोलेत महिलांची मनोभावे पूजा-अर्चा ग्रामीण भागात वारुळाची तर शहरात महादेव मंदिरात पूजा

नायक वृत्तसेवा, अकोले
भारतात अनेक सण दरवर्षी मोठ्या उत्साहात पारंपारिक पद्धतीने साजरा होत असतात. त्यापैकीच एक म्हणजेच नागपंचमी हा सण आहे. खरेतर हिंदू धर्माच्या दिनदर्शिकेनुसार नागपंचमी हा उत्सव श्रावण महिन्याच्या शुल्क पक्षात येत असतो. त्यादिवशी महिला मनोभावे वारुळ, नागदेवता आणि महादेवाची मनोभावे पूजा-अर्चा करतात. अकोले शहरासह तालुक्यातही ठिकठिकाणी महिलांनी वारुळाची पूजा केली.

श्रावणातला पहिला सण म्हणून वर्णी लावणार्या नागपंचमी या सणाचं महत्त्व विशेषत: खेड्यापाड्यांतून जास्त जपलं जातं. यादिवशी काही ठिकाणी वारुळाची पूजा होते. नागपंचमी म्हटलं की, सर्वप्रथम बत्तीस शिराळे हे गाव डोळ्यासमोर येतं. तिथे जिवंत नाग पकडून, त्यांची पूजा करून त्यांच्या रथातून मिरवणुका काढल्या जातात. त्यामुळे बत्तीस शिराळे येथील नागपंचमीला मोठ्या उत्सवाचं रूप आलेलं असतं. परंतु, ग्रामीण भागात साप हा शेतकर्याचा मित्र असल्याने महिला वारुळाचीच पूजा करतात. अकोले तालुक्यातील रुंभोडी येथे महिलांनी वारुळाची तर अकोले शहरातील महादेव मंदिरातसह नागाची कृत्रिम प्रतिकृती साकारुन महिलांनी अभिषेक केला.

दरम्यान, नागपंचमीच्या मुहुर्तावर दुपारच्या प्रहरी अनेक गावात फुगड्यांचा विडा उचलला जातो. काही परंपरागत मांडावर नागोबाच्या नावानं फुगड्या घातल्या जातात. मग या दिवसापासून गौरीपर्यंत टप्प्याटप्प्यानं हा फुगड्यांचा खेळ घराघरात रंगतो. तर ग्रामीण भागात झोके बांधून लहानगण्यांसह तरुणाई आनंद लुटतात. त्याचेच चित्र सर्वत्र झोक्यावर फेर धरताना पाहायला मिळाले.
