संगमनेरच्या ‘जाणत्या’ शिवसैनिकांचा जिल्हाप्रमुखांनाच ‘अल्टीमेटम’! सेनेतील फूट पोहोचली वेशीवर; आदित्य ठाकरेंच्या शिर्डी भेटीनंतर हालचाली वाढणार..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
विविध राजकीय घडामोडींनंतर शिवसेना फुटीच्या उंबरठ्यावर पोहोचली असून आधी आमदार, मग खासदार आणि आता आजी-माजी नगरसेवक पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची साथ सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी होवू लागले आहेत. गुरुवारी अहमदनगर महापालिकेतील काही आजी-माजी नगरसेवकांसह दक्षिणेचे जिल्हाप्रमुख शशीकांत गाडे यांचे सुपूत्र व बंधुंनीही शिंदे गटात प्रवेश केला आहे. आता संगमनेरातील जवळपास तीस जुन्या व जाणत्या शिवसैनिकांनी स्थानिक पदाधिकार्‍यांविरोधात तक्रार करीत आठ दिवसांत त्याची योग्य दखल घेतली गेली नाही तर उपलब्ध असलेल्या पर्यायाचा वापर करण्याचा अल्टीमेटमच जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांना दिला आहे. त्यामुळे सेनेतील उभी फूट आता अहमदनगर नंतर संगमनेर शहराच्या वेशीवर येवून पोहोचली असून येत्या शनिवारी (ता.23) युवासेनाध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या शिर्डी भेटीनंतर हालचालींना वेग येणार असल्याची माहिती दैनिक नायकला प्राप्त झाली आहे.

 

संगमनेर तालुक्यात शिवसेनेची पाळेमूळे खोलवर रुजलेली आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना मानणारा मोठा वर्ग तालुक्याच्या विविध भागात आहे. त्यामुळे राज्यात इतक्या मोठ्या प्रमाणात राजकीय उलथापालथ घडूनही संगमनेरातील शिवसैनिक पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबतच असल्याचे चित्र दिसत होते. मात्र हा अभास असल्याचे आता जाणवू लागले असून तालुक्यात शिवसेना रुजविणार्‍या, खेडोपाडी पोहोचवणार्‍या जवळपास तीसहून अधिक जाणत्या शिवसैनिकांनी ‘गुप्त बैठक’ घेवून या घडामोडींमध्ये आपली दिशा काय असावी यावर मंथन केल्याची विश्वसनीय माहिती दैनिक नायकला प्राप्त झाली आहे. या बैठकीत पक्षप्रमुखांनी संगमनेरातील शिवसेनेत संघटनात्मक बदल केल्यास वेगळा विचार करण्याची गरज नसल्याचाही सूर काही शिवसैनिकांनी आळवल्याची माहिती आहे.

त्यानुसार संबंधितांनी उत्तर नगरचे जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांच्याशी संपर्क साधून त्यांना आपला निर्णय कळविला असून विद्यमान पदाधिकार्‍यांबाबत गंभीर तक्रारी केल्या आहेत. यापूर्वी पक्षाकडे वारंवार तक्रारी करुनही त्याची दखल घेतली गेली नसल्याने अनेक शिवसैनिक नाराज असल्याचे व वेगळा विचार करीत असल्याचेही त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले आहे. गेल्या दशकभरात स्थानिक शिवसेनेची वाढ खुंटली असून निष्ठावानांना वारंवार डावलून त्यांची पद्धतशीर बदनामी करण्याचे षडयंत्र राबविले गेल्याने ज्यांनी तालुक्यात शिवसेना पोहोचवली, त्यासाठी अपार परिश्रम घेतले, असंख्य गुन्हे अंगावर घेतले अशा सच्चा शिवसैनिकांना खितपत पडावे लागल्याचेही जाणत्यांच्या या गटाने जिल्हाप्रमुखांना सांगितले आहे. या सर्व गोष्टींचा आतातरी गांभीर्याने विचार करावा व उत्तरनगर जिल्ह्यातील संभाव्य फूट टाळावी, अन्यथा उपलब्ध असलेल्या पर्यायाकडे जाण्याशिवाय अन्य मार्ग उरणार नसल्याचेही त्यांना ठणकावण्यात आल्याची माहिती आहे.

अहमदनगर शहरातही सुरुवातीला अशीच स्थिती होती. मात्र महापालिकेतील सेनेचे सर्वात ज्येष्ठ नगरसेवक अनिल शिंदे मात्र सुरुवातीपासूनच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात होते. गेल्या मंगळवारी तेथील संपर्कप्रमुखांनी सर्व आजी-माजी नगरसेवक व पदाधिकार्‍यांची बैठकही घेतली. मात्र त्याच्या दुसर्‍याच दिवशी अहमदनगरच्या शिवसेनेला भगदाड पडले आणि चक्क दक्षिणेतील जिल्हाप्रमुख शशीकांत गाडे यांचे सुपूत्र योगीराज व बंधू रमाकांत यांच्यासह अनेक आजी-माजी नगरसेवक व शिवसैनिकांनी बुधवारी (ता.20) थेट मुंबईत जावून मुख्यमंत्र्यांची भेट घेतली व आपण शिंदे गटात सहभागी असल्याची घोषणाही केली. जिल्ह्यातील शिवसेनेत झालेली ही पहिली बंडाळी ठरली असली तरीही तत्पूर्वीच संगमनेरातील जाणत्या शिवसैनिकांनी ‘गुप्त बैठक’ घेवून पदाधिकार्‍यांबाबत नाराजीचा मुद्दा उपस्थित केल्याने व त्यावर कारवाई हाच उतारा असल्याचे सांगत त्यासाठी अल्टीमेटमही दिल्याने नगरची बंडळी अंतिम ठरणार नाही हे निश्चित आहे.


उत्तर नगर जिल्ह्यातील असंख्य शिवसैनिकांमध्ये सध्या चलबिचल सुरू आहे. मात्र जोपर्यंत संगमनेरची शिवसेना पक्षाशी बांधील राहील तोपर्यंत उत्तरेत पक्षात फूट पडण्याची शक्यता नाही. मात्र संगमनेरात असा प्रकार घडल्यास त्याचे पडसाद संपूर्ण जिल्ह्यात बघायला मिळतील असा दावा एका ज्येष्ठ शिवसैनिकाने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर दैनिक नायककडे केला आहे. जिल्ह्यातील अनेक शिवसैनिक दररोज फोन करुन संपर्क साधीत असून काय निर्णय घ्यावा अशी विचारणा करीत आहेत, मात्र त्यांना ‘थांबा आणि पाहा’ असा सल्ला दिल्याचे सांगत हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची प्रतारणा होणार नाही असाच निर्णय आम्ही एकमताने घेवू असेही या ज्येष्ठ शिवसैनिकाने सांगितले.

Visits: 41 Today: 1 Total: 207845

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *