बंद घराचा दरवाजा तोडून दहा तोळे सोन्यासह रोकड लंपास! चंदनापुरीतील घटनेने ग्रामीणभागातील नागरिकांमध्ये पसरली चोरट्यांची भीती..

नायक वृत्तसेवा, संगमनेर

तालुक्याच्या ग्रामीणभागात अधुनमधून चोरीच्या घटना समोर येण्याची श्रृंखला सुरुच असून रविवारी रात्री चंदनापुरी गावातील एका वृद्ध महिलेच्या बंद घराचा दरवाजा तोडून चोरट्यांनी आपला कार्यभाग उरकला. आपल्या सतरावर्षीय नातीसह पुणे-नाशिक महामार्गालगत राहणारी ही महिला कौटुंबिक कार्यक्रमासाठी बाहेरगावी गेली होती, या संधीचा फायदा घेत चोरट्यांनी त्यांच्या घराचा दरवाजा तोडून जवळपास दहा तोळे सोन्याच्या दागिन्यांसह सुमारे पंधरा हजार रुपयांची रोकड घेवून पोबारा केला. आज (ता.26) सकाळी सदर महिला माघारी परतल्यानंतर चोरीची घटना समोर आली. याबाबतची माहिती मिळताच तालुका पोलीस ठाण्याच्या कर्मचार्‍यांसह नगरहून श्वानपथकाला पाचारण करण्यात आले आहे. या घटनेने तालुक्याच्या ग्रामीणभागात चोरट्यांची भीती निर्माण झाली आहे.

याबाबत समजलेल्या माहितीनुसार संगमनेर शहरापासून अवघ्या आठ किलोमीटर अंतरावरील चंदनापुरी शिवारात रविवारी (ता.25) रात्रीच्या वेळी सदरची घटना घडली. ताराबाई उत्तम रहाणे (वय 65) या आपल्या सतरावर्षीय नातीसह चंदनापुरी गावालगत पुणे-नाशिक महामार्गालगतच राहतात. त्यांचा मुलगा व सून नोकरीनिमित्ताने बाहेरगावी राहतात. रविवारी त्या दोघी नातेवाईकाच्या कार्यक्रमासाठी अन्यत्र गेल्या, जाताना त्यांनी आपल्या घराला कुलूपही लावले. या दरम्यान रविवारी सायंकाळपासून ते आज (ता.26) सकाळपर्यंत सदर चोरीची घटना घडली. कार्यक्रम आटोपून त्या दोघी आज सकाळी चंदनापुरीत आपल्या घरी आल्या असता त्यांना घराचा दरवाजा तोडलेल्या अवस्थेत दिसून आला.

घरात जावून पाहिले असता कपाटातील सर्व वस्तू व कपड्यांची उचकापाचक झाल्याचे त्या दोघींना दिसले. याबाबत त्यांनी तत्काळ चंदनापुरीचे पोलीस पाटील ज्ञानदेव रहाणे यांना माहिती दिली. त्यांनी तालुका पोलिसांना याबाबत कळविल्यानंतर सहाय्यक फौजदार इस्माईल शेख यांनी घटनास्थळाकडे धाव घेत पाहणी केली. वरीष्ठांना चोरीबाबत आणि चोरी गेलेल्या वस्तुंबाबत माहिती दिल्यानंतर नगरहून श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले. मात्र नुकताच पाऊस होवून गेल्याने श्वानाने केवळ मागील दारापर्यंत माग काढला, त्यामुळे चोरीच्या तपासात श्वानाकडून फारशी मदत होण्याची अपेक्षा धुसर बनली आहे.

श्रीमती रहाणे यांनी पोलिसांना दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार त्यांच मुलगा व सून नोकरीनिमित्त बाहेरगावी रहात असल्याने त्या आपल्या सतरावर्षीय नातीसोबत गेल्या अनेक वर्षांपासून चंदनापुरीतील पुणे-नाशिक महामार्गालगत राहतात. त्यांनी कपाटात सुमारे दहा तोळे सोन्याचे दागिने ठेवलेले होते, त्यासोबतच जवळपास पंधरा हजार रुपयांची रोकडही ठेवलेली होती. मात्र चोरट्यांनी संपूर्ण घराची उचकापाचक करुन कपाटात व्यवस्थित लपवून ठेवलेले दागिने व रोख रक्कम हुडकून पोबारा केला. घरफोडीची माहिती मिळाल्यानंतर श्वान पथकाला पाचारण केले गेले, मात्र त्याचा उपयोग झाला नाही. आता ठसेतज्ज्ञ, सहाय्यक निरीक्षक एम.डी.मदने यांचे पथक घटनास्थही दाखल झाले असून चोरट्यांचे ठसे मिळविण्याचा प्रयत्न सुरु आहे. या घटनेने चंदनापुरीसह तालुक्यातील ग्रामीणभागात चोरट्यांची भीती निर्माण झाली असून तालुका पोलिसांनी या घटनेचा तपास करुन नागरिकांच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.


मोठ्या लोकसंख्येच्या गावांमध्ये समावेश असलेले चंदनापुरी गाव पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील महत्वाचे केंद्र समजले जाते. दिवस-रात्र महामार्गावरुन वाहनांची वाहतूक सुरु असल्याने सदरचे गाव सुरक्षितही मानले जाते. मात्र चोरट्यांनी आता महामार्गावरील बंद असलेली घरे लक्ष्य करुन आपले मनसुबे पूर्ण करण्यास सुरुवात केल्याने चंदनापुरीसह ग्रामीणभागातील नागरिकांमध्ये चोरट्यांविषयी भीती निर्माण झाली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा जलद तपास करुन नागरिकांच्या मनातील भीती घालवण्याची गरज आहे. सहाय्यक फौजदार इस्माईल शेख कर्तव्यतत्पर अधिकारी म्हणून तालुका पोलिसांच्या वर्तुळात ओळखले जातात, सदरचा प्रकार त्यांच्याच हद्दीत असल्याने त्यांच्याकडून या प्रकरणाचा उलगडा होईल अशी येथील नागरिकांना अपेक्षा आहे.

Visits: 10 Today: 1 Total: 115824

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *