लसीकरणासह कोविड चाचण्यांबाबत जनजागृती करा ः डॉ. भोसले संगमनेरात संगमनेर, पारनेर आणि अकोले तालुक्यांची आढावा बैठक
नायक वृत्तसेवा, संगमनेर
लसीकरणाचे प्रमाण वाढवून ते शंभर टक्के करावे. यासाठी सर्वच तालुक्यातील विविध यंत्रणांनी समन्वय ठेवून गावनिहाय लसीकरण करण्यासाठी यादी तयार करुन नागरिकांचे प्रबोधन करावे. यासाठी सूक्ष्म नियोजन करुन सर्व आस्थापनांतील अधिकारी व कर्मचार्यांचे लसीकरण करण्याबरोबर कोविड चाचण्यांचे प्रमाण वाढवावे, लसीकरण वाढविण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी, शिक्षक यांना लसीकरण मोहिमेत सहभागी करुन घ्यावे. जास्तीत-जास्त लसीकरण व चाचण्या कशा होतील याबाबत जनजागृती करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी केली.
कोविडच्या संभाव्य तिसर्या लाटेच्या पार्श्वभूमीवर तालुका प्रशासनातर्फे करण्यात आलेल्या उपाययोजनांचा आढावा जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी गुरुवारी (ता.6) संगमनेर येथे घेतला. जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांच्या अध्यक्षतेखाली संगमनेर येथील पंचायत समिती सभागृहात संगमनेर, पारनेर आणि अकोले तालुक्यातील उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, प्रांताधिकारी डॉ. शशीकांत मंगरुळे, तहसीलदार अमोल निकम, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भूषणकुमार रामटेके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकिय अधीक्षक डॉ. राजकुमार जर्हाड, गटविकास अधिकारी, जिल्हा परिषद सदस्य अजय फटांगरे, रामहरी कातोरे, पंचायत समिती सभापती सुनंदा जोर्वेकर, उपसभापती नवनाथ अरगडे, सदस्य अशोक सातपुते व विष्णूपंत रहाटळ उपस्थित होते.
या बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी लसीकरण व कोविड चाचण्या वाढविण्यासाठी आवश्यक निर्बंध लावण्याची सूचना करतानाच ऑक्सिजन यंत्रणा कार्यान्वित आहेत याची खात्री करणे, कोविड सेंटरमध्ये स्वच्छता, गरम पाणी सुविधा, वीज, ऑक्सिजन बेडची व्यवस्था आणि आय. सी. यू. कक्षाची व्यवस्था तसेच प्राथमिक गरजा लक्षात घेऊन नियोजन करण्याचे सूचित केले. 15 ते 18 वयोगटातील मुलांचे लसीकरण यावर सुध्दा लक्ष केंद्रित करुन लसीकरणाचा वेग वाढविण्याकडे लक्ष द्यावे, वैद्यकीय उपचारांसाठी दवाखान्यात उपलब्ध असलेल्या बेडची संख्या, कोविड रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरीकांची चाचणी करण्याच्या सूचना केल्या. तसेच कोविड नियमांची कडक अंमलबजावणी करण्यासाठी योग्य त्या उपाययोजना पोलीस विभागासह संबधित विभागांनी करण्याचेही बैठकीत सूचित करण्यात आले. संगमनेर भागाचे प्रांताधिकारी डॉ.शशीकांत मंगरुळे यांनी तालुकास्तरीय यंत्रणांनी केलेल्या कार्याचा आढावा सादर केला.