कारखाना स्थापनेपासून यंदा सर्वाधिक गाळप केले ः गायकर अगस्ति सहकारी साखर कारखान्याच्या 28 व्या गळीत हंगामाची सांगता
नायक वृत्तसेवा, अकोले
महिनाभर अनेकांच्या प्रश्नांचा भडीमार, टीका सहन केली, अधिकारी-कर्मचारी यांनीही भरपूर मनःस्ताप सहन करुन आज आनंदात गळीत पूर्ण केला आहे. चालू हंगामात 205 दिवस गाळप सुरू राहून 6 लाख 22 हजार मेट्रिक टन ऊसाचे गाळप झाले असून हे कारखाना स्थापनेपासून सर्वाधिक उंच्चाकी गाळप केले असल्याचे प्रतिपादन अगस्ति कारखान्याचे उपाध्यक्ष व जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सीताराम गायकर यांनी केले आहे.
अगस्ति सहकारी साखर कारखान्याचा सन 2021-22 चा 28 व्या ऊस गळीत हंगामाची सांगता गुरुवारी (ता.26) शेवटची मोळी मान्यवरांच्या हस्ते गव्हाणीत टाकून करण्यात आली. अध्यक्षस्थानी कारखान्याचे उपाध्यक्ष सीताराम गायकर होत. तर यावेळी संचालक मीनानाथ पांडे, महेश नवले, राजेंद्र डावरे, प्रकाश मालुंजकर, गुलाब शेळके, मच्छिंद्र धुमाळ, सुनील दातीर, अशोक आरोटे, कचरु शेटे, मनीषा येवले, सुरेखा देशमुख, बाळासाहेब देशमुख, कार्यकारी संचालक अजित देशमुख, दूध संघ संचालक आनंद वाकचौरे, अप्पासाहेब आवारी, भाऊसाहेब बराते, लेखापाल एकनाथ शेळके, केन मॅनेजर सयाजी पोखरकर, शेतकी अधिकारी सतीष देशमुख आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना उपाध्यक्ष सीताराम गायकर म्हणाले, अगस्तिचे 205 दिवस गाळप सुरू असताना अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालक मंडळाने वारंवार बैठका घेऊन गाळपाचे उत्तम नियोजन केले आहे. कारखाना चालविण्यासाठी, डिस्टलरी चालविण्यासाठी जिल्हा बँकेसह तालुक्यातील पतसंस्थेकडून कर्ज घेतले. स्थापनेपासून अडचणीतून वाटचाल करणारा हा अगस्ति कारखाना आहे. 1 ते 2 लाख मेट्रिक टन गाळपापासून आज 6 लाख 22 हजार टन ऊस गाळपापर्यंत अगस्तिने मजल मारली आहे. कारखान्याबाबत आम्ही कोणतीही गोष्ट लपवलेली नाही. जे खरं आहे ते जनतेसमोर मांडलं. कारखान्यावर कर्ज आहे कारखाना अडचणीत आहे, अडचणीतून वाटचाल सुरू आहे. मात्र शेतकर्यांची कामधेनू असलेला हा कारखाना टिकला पाहिजे, चालला पाहिजे, बंद पडू नये ही भूमिका कायम जाहीर केली. चालू हंगामात 70 लाख लिटर इथेनॅाल निर्मिती केली असून 20 कोटी उत्पादन मिळून ऊसातील तोटा इथेनॅाल प्रकल्पातून भरून निघेल, असे शेवटी सांगितले. गळीत हंगामाचा आढावा सांगताना कार्यकारी संचालक अजित देशमुख म्हणाले, मी कार्यभार घेतल्यानंतर जाणीव झाली कि अध्यक्ष मधुकर पिचड, उपाध्यक्ष सीताराम गायकर व संचालक मंडळ कारखाना चालविण्यासाठी सक्षम आहे. त्यांचे निर्णय व मार्गदर्शनाने आज गळीत चांगले पूर्णत्वास गेले आहे. सूत्रसंचालन मुख्य लेखापाल एकनाथ शेळके यांनी केले तर आभार केन मॅनेजर सयाजी पोखरकर यांनी मानले.